सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीचा दबदबा |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
सांगली : अत्यंत प्रतिष्ठेची व चर्चेची ठरलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (SDCB)निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली दिसत आहे. विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने ७ पैकी ६ जागा जिंकत हुकुमत राखली, मात्र जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी असल्याचे दिसून येते आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड ते तिघे जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा ९ , काँग्रेस ५ , भाजप ४ व शिवसेना ३ असा निकाल लागला.
सोसायटी गटातून वाळवा तालुक्यातील विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील विजयी झाले. अत्यंत संवेदनशील ठरलेल्या आटपाडीत शिवसेनेचे तानाजी पाटील यांची बाजी मारली. या ठिकाणी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव झाला. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली, तासगावमध्ये राष्ट्रवादीचे बी. एस. पाटील विजयी झाले आहेत. कडेगावमधून आमदार मोहनराव कदम पुन्हा जिल्हा बँकेत (co operative development) आले आहेत.
जिल्हा बँकेच्या महिला राखीव गटातून काँग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील व राष्ट्रवादीच्या श्रीमती अनिता सगरे यांचा मोठा विजय झाला. इतर मागास प्रवर्गातून काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांचा सलग दुसऱ्यांदा विजयी झाले, राष्ट्रवादीचे मन्सूर खतीब यांनीही बाजी मारली आहे. पतसंस्था गटातून कॉंग्रेचे पृथ्वीराज देशमुख, तर भाजपचे राहुल महाडिक विजयी झाले.
प्रक्रिया गटातून दिवंगत आर.आर.पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, इतर संस्था गटातून राष्ट्रवादीचे वैभव पाटील विजयी झाले. मजूर संस्था गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि सत्यजित देखमुख विजयी झाले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि महा विकास आघाडीने बाजी मारत जिल्हा मध्यवर्ती बँक काबीज केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा