Breaking

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

खोची मधील अत्याचार व खून झालेल्या बालिकेला न्याय मिळण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली शोकसभा व कॅन्डल मार्च


खोची मध्ये दारू विक्रेत्याच्या घरावर जमावाचे हल्ला

प्रा. अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


   कोल्हापूर जिल्ह्यातील खोची या ठिकाणी अत्याचार होऊन खून झालेल्या बालिकेला न्याय  (justice) मिळाला पाहिजे, या मागणीसाठी खोची मधील ग्रामस्थांनी शोक सभेचे आयोजन केले. यावेळी काढलेल्या कँडल मार्चनंतर महिलांचा जमाव अवैध दारू विक्री बंदीसाठी प्रक्षुब्ध झाला. महिलांच्या संतप्‍त जमावाने रात्री आठ ते नऊच्या दरम्यान अवैध दारू विक्री करणार्‍या दोन ठिकाणी हल्लाबोल केला. यावेळी दारू विक्रेते कुटुंबासह पसार झाले. अवैध दारू विक्री बंद झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी यावेळी जमावाने केली. 

     वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे व सहायक निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. अवैध धंदे संपूर्णपणे बंद केले जातील, असे आश्‍वासन दिल्यानंतर प्रक्षुब्ध जमाव शांत झाला.

    खोची येथील दुर्दैवी बालिकेला न्याय मिळावा, या मागणीसाठी आयोजित शोकसभेत महिलांनी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, या मागणीसोबतच व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, यासाठी दारूबंदी तत्काळ झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरली. न्याय (justice) मिळाल्याशिवाय श्रद्धांजली वाहिली जाणार नाही, अशी भूमिकाही यावेळी महिलांनी घेतली.

      सरपंच जगदीश पाटील, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व मान्यवर नेत्यांच्या मध्यस्थीनंतर महिलांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर शोकसभा पार पडली. शोकसभेनंतर दारूबंदीच्या मागणीसाठी महिला पेटून उठल्या आणि त्यांनी आपला मोर्चा अवैध धंदे, दारू विक्री केंद्रांकडे वळविला. महिलांचा संतप्‍त जमाव पाहून विक्रेते कुटुंबासह पसार झाले.यानंतर महिलांनी दारू विक्रेत्याच्या घरावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच पोलिस निरीक्षक घोळवे यांच्या पथकाने जमाव शांत करून अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद केली जाईल, असे आश्‍वासन दिले. यानंतर दुसर्‍या दारूअड्ड्यावर महिलांनी हल्ला चढविला. पोलिसांनी हस्तक्षेप करून महिलांना घरी जाण्याचे आवाहन केले. यावेळी महिलांनी गावात होणारी दारू विक्री बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्‍त केला.

गावात कडक दारूबंदीची मागणी

     अवैध दारू विक्रीविरोधात खोची येथून बर्‍याच वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यापासून पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत या तक्रारी देण्यात आल्या. कारवाईनंतर काही दिवस विक्री बंद केली जाते आणि पुन्हा विक्री सुरू होते. यामुळे महिलांनी संपूर्णपणे दारू बंद झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी लावून धरली. 

     पोलीस प्रशासनाकडून गंभीरपणे कडक निर्बंध दारूबंदीवर घालून  त्याची उचित अंमलबजावणी करावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा