नागपूर मध्ये खुनी घटना |
राज्याची उपराजधानी नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून क्राइम रेट वाढतच चालला आहे. दरदिवशी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात हत्येच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. गुंडाच्या मारामारी व हत्येबाबत नागपूर शहर कुविख्यात आहे. सध्या देशात सर्वत्र दिवाळी सण अत्यंत थाटामाटात साजरा केला जात असताना, मध्यरात्री नागपुरात (Nagpur) एका गुंडाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. घराबाहेर बसल्याच्या रागातून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
यशोधरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार,जफर अब्बास बरकत अली असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव असून तो नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील रहिवासी आहे. मृत जफर हा कामठी परिसरातील गुंड असून त्याच्याविरोधात बरेच गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जफर हा आरोपीच्या घरासमोर बसला होता. बराच वेळ घरासमोर बसल्याने आरोपीनं त्याला हटकलं.घरासमोर बसल्याच्या कारणातून दोघांमधील वादाला सुरुवात झाली. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. यामुळे संतापलेल्या आरोपीनं जफर याची निर्घृण पद्धतीने हत्या केली आहे. मध्यरात्री घडलेल्या या हत्येच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती यशोधरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृत गुंडाचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी नागपुरात एका कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच एका टोळक्यासोबत झालेल्या वादानंतर संबंधित गुंडाची हत्या करण्यात आली होती.संबंधित गुंडाचं नाव फ्रँक अँथनी असं होतं. फ्रँक हा नागपुरातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल होते. फ्रॅंकच्या हत्येची घटना ताजी असताना नागपुरात आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झालं आहे.
नागपुरातील या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर शहर हे देशातील ऑरेंज सिटी म्हणून ओळख असताना अशा या गुन्हेगारी घटनेने भविष्यात हे शहर गुन्हेगारांचे शहर म्हणून समोर येऊ नये एवढीच अपेक्षा येथील जनतेची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा