सुप्रसिद्ध विचारवंत व लेखक मा.प्रसाद कुलकर्णी |
नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली गेलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने टाइम्स नाऊ चॅनेलच्या कार्यक्रमात भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे आणि खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळालेले आहे असे मेंदू गहाण टाकणारे वक्तव्य केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे विषारी वक्तव्य करून तिने भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व सहभाग घेतलेल्या लाखो स्वातंत्र्यविरांचा अपमान केला आहे.तसेच पंडित नेहरू ते डॉ.मनमोहनसिंग व्हाया अटलबिहारी वाजपेयी या स्वतंत्र भारतातील सर्व पंतप्रधानांचा,त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचा आणि पर्यायाने या देशातील समस्त नागरिकांचाही अपमान केला.त्याचा जाहीर निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार कोण होते आणि भारतीय स्वातंत्र्याचे मारेकरी कोण होते हा खरा इतिहास जगाला ज्ञात आहे. तो पुसला वा बदलला जाणे अशक्य आहे.
कंगना सारखी विकृती काहींना होत असते याचे खरे कारण न्यानगंडात आहे.कारण इंग्रजांच्या बाजूने असणाऱ्या काही विचारधारांकडे खरे लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक नाहीत. काहींनी इंग्रजांना सहकार्याचा शब्द दिला,माफीही मागीतली होती.अनेक वर्षे काही मंडळी स्वातंत्र्यदिनही साजरा करत नव्हती उलट काळा दिन मानत होती.पण आता परिस्थिती बदलली, उशिरा का होईना पण शहाणपण आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी ,पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक दिग्गज नेत्यांचे कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य आहे.हा देश विसाव्या - एकविसाव्या शतकात गांधी ,नेहरूं, भगतसिंग अशा अनेकांच्या नावे ओळखला जातो.ते पुसून टाकणे अशक्य आहे.हे कळल्यामुळे अन्य विचारधारांतील थोर नेते,स्वातंत्र्य सैनिक आपलेच आहेत असे दाखविण्याचा व या मंडळींना खुजे ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला व आजही होतो आहे. स्वातंत्र्य आंदोलनापासून राज्यघटनेपर्यन्तच्या बाबतीत कंगना सारखी विकृत विधाने अनेकांनी यापूर्वी मळमळत केलेली आहेत.कंगनाच्या या देशद्रोही विधानावर मूग गिळून बसलेल्यांचा ,दातखिळी बसलेल्यांचा आणि तिच्या विधानावर दात काढून हसणाऱ्यांचाही जाहीर निषेध केला पाहिजे.कारण असे वक्तव्य ऐकून घेणारे आहेत म्हणून ती बोलायचे धाडस करू शकली. स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या,गोळ्या झेलून शहीद होणाऱ्या, सर्वस्वाचा होम करणाऱ्या ,झाशीची राणी लक्ष्मीबाई ते शहीद भगतसिंग आणि नेताजी सुभाषबाबू ते महात्मा गांधी अशा थोर पूर्वजांचा अपमान होत असताना गप्प राहणाऱ्या विकृतीच्या देशनिष्ठा तपासाव्या लागतील.खासदार वरुण गांधी यांनी कंगनाच्या हे वक्त्यव्य माथेफिरू की देशद्रोही हा प्रश्न उपस्थित केला आहे. एखादेवेळी कोणताही पुरस्कार भीक म्हणून मिळू शकतो ,पण देशाचे स्वातंत्र्य भीक म्हणून मिळू शकत नाही.हे कंगना आणि तिच्या पाठीराख्यानी ध्यानात घ्यावे. इथल्या सर्वसामान्य जनतेने ब्रिटिशांसह अनेक आक्रमक परकीय सत्ताधाऱ्यांचा माज उतरवला आहे.तिथे देशविरोधी बोलणाऱ्या एतद्देशीयांना धडा शिकवणे सर्वसामान्य जनतेला अवघड नसते हा इतिहास आहे.तेंव्हा वाचाळानी जिभेला आवर घालावा. सरकारनेही देशाचा अपमान करणाऱ्या कंगनाला दिलेला पुरस्कार परत घ्यावा.अशाही पुरस्कार वापसीची तातडीची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा