Breaking

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद

 

विविध मागण्यांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक आंदोलन


मुंबई :  राज्य शासनाकडे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित असून यासाठी सातत्याने शासनाकडे मागण्या करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय स्तरावर लांबणीवर आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज सोमवार २२ नोव्हेंबर,२०२१ रोजी  राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंदचे हत्यार उपसले आहे. यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज बंद राहणार आहे.

       राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०,२० व ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, अकृषी विद्यापीठातील ७९६ पदांना ७ वा वेतन आयोग त्वरित लागू करावा, विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व समकक्ष पदांना युजीसीच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात यावी आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारला आहे.

         या प्रलंबित मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच संचालनायलाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या सोमवारी एक दिवस सर्व विद्यापीठातील कामकाज बंद असणार आहे असे समितीने स्पष्ट केले आहे.

1 टिप्पणी: