✍🏼 मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
जयसिंगपूर (दि. १५ नोव्हें). आज रोजी पहाटे रेल्वे स्टेशन येथील परिसरात स्थानिक शेतकऱ्यांना गवा सदृश प्राण्याचे दर्शन झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाऊल खूनांवरून तो गवाच असल्याची पुष्टी केली आहे.
जयसिंगपूर परिसरात आढळलेले गव्यांच्या पायांचे ठसे |
काल कवठेसार येथे गवा दिसला होता, व आज पहाटे जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांना दोन ते तीन गवे दिसले. गव्याची बातमी समजताच वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर.के.देसा, हातकणंगले विभाग, वनरक्षक आर. टी. सावंत, एम. ए.देसाई - शिरोळ विभाग, वनकर्मचारी, व अँनिमल सहारा फाउंडेशन चे सदस्य सर्वदमन कुलकर्णी, अक्षय मगदूम, चिंतामणी कुलकर्णी, विजय पाटील, सागर पाटील, मालोजीराव माने यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. व पाऊल खुनांवरून तो गवा सदृश्य प्राणी हा गवाच असल्याची पुष्टी केली. व परिसरात नागरिकांना सावध करत माहिती दिली.
या गावांना सावधानतेचा इशारा
तरी जयसिंगपूर परिसर, उदगाव, उमळवाड, कोथळी, चिंचवाड, दानोळी, परिसरात हे गवे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाचे वनपाल आर. के देसा व वनरक्षक आर.टी. सावंत, एम. ए. देसाई, यांनी या गावात जाऊन तशा सूचना दिल्या आहेत. तसेच येथील नागरिकांनी येते काही दिवस खबरदारी बाळगण्याची तसेच गव्यास कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
गवा हा शांत स्वभावाचा प्राणी असून तो मुद्दाम कोणावरही हल्ला करत नाही. तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शेतीपरिसरात वावरताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. जरी गवा दिसलाच तरी कोणताही दंगा न करता त्याला त्याच्या वाटेने पुढे जाऊ द्यावे.
रमेश कांबळे, वनक्षेत्रपाल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा