नृसिंहवाडी येथे धार्मिक सोहळा : गुरुमाऊली मोरे |
प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी
नृसिंहवाडी : जवळपास दोन वर्षे झाली संपूर्ण जग एका संकटाला सामोरे जात आहे, येणारा काळ देखील काहीसा अडचणींचा आहे या सर्व परिस्थितीत जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा भरडला जात आहे, त्याला अशा संकटातून धीर देण्यासाठी सेवा मार्गाच्या वतीने ग्रामअभियान जोमाने राबवावे लागेल असे सांगतानाच भारतीय संस्कृती टिकवण्याचे काम अनादिकालापासून महिला भगिनींनी केले असून पाश्चिमात्य अतिक्रमणे रोखण्याचे मोठे काम आता महिलांनाच करावे लागणार आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्तीपीठाचे पीठाधिश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी केले.
केवळ वैयक्तिकच नाही तर सामाजिक बांधिलकीतून सेवा मार्गाने आजवर भरीव कार्य केले आहे. त्यामुळे संस्कार केले तर संस्कृती टिकेल,संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल असा दिव्य संदेश प.पू. गुरुमाऊली यांनी यावेळी दिला.दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नव्याने बांधलेल्या सेवा केंद्राची वास्तुशांती, स्वामी महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा दरबार स्थापना,एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने ता ६,७ आणि ८ डिसेंबर,२०२१ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्ताने श्री चिमासाहेब जगदाळे महाविद्यालय ग्राउंड वर आयोजित भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्यात मार्गदर्शन करताना अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व अष्टसिद्धी महाशक्तीपीठाचे पीठाधिश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे बोलत होते,ते म्हणाले,धर्म, देश, प्रांत, सीमा यांच्या पलिकडे जाऊन मानवी जीवनाचा सर्वांगीण व परिपूर्ण विकास करण्याची सेवा सांगणारे, ग्राम व नागरी अभियानाव्दारे संस्कृती जपून राष्ट्रीय विकास साधण्याचा ध्यास, विश्वकल्याणात्मक उन्नतीसाठी अनेक यशस्वी अभियाने हजारो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात, भारत देशात व देशाबाहेर राबवले जात आहेत व त्याची अनुभूती सर्वच घेत आहेत. उपस्थित भाविक सेवेकरी यांना आपल्या अमृततुल्य हितगुजातून मार्गदर्शन करताना शेतीशास्त्र, आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, बालसंस्कार, युवा प्रबोधन, गर्भसंस्कार, मानवाच्या विविध समस्या, गुरुप्रणाली अंतर्गत ग्राम अभियान, स्वयंरोजगार, शेतीसाठी आधुनिक तंत्र, शेतीचे वास्तुशास्त्र ह्या मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवर परमपूज्य गुरुमाऊली यांनी प्रबोधनात्मक हितगुज साधला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभारण्यात सर्वांनी योगदान द्यावेअसे आवाहन श्री मोरे यांनी केले. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक, गोवा राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातून सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बत्तीस शिराळा सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी स्वागतगीत सादर केले.तत्पूर्वी श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पार्वती कुंभार ,उपसरपंच रमेश मोरे यांनी गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आल.प्रारंभी स्वागत आणि प्रस्ताविक इचलकरंजी सेवा केंद्राचे रमेश शिरगुरे यांनी केले.
व्यासपीठावर गुरू पुत्र चंद्रकांत दादा मोरे,नितीनभाऊ मोरे, आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने,माजी आमदार उल्हास पाटील, राजीव आवळे,विटा नगरपालिका नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, कराड नगरपालिका नगराध्यक्षा रोहिणी शिंदे,धनाजीराव जगदाळे दादा, इस्ताक सर मौलवी यांच्यासह नृसिंहवाडी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा