Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम संपन्न*

 

डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर


जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी


    जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.मेहबूब मुजावर व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने हे होते.

        या कार्यक्रमात कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सौ.मनीषा काळे व  प्रमुख पाहुणे प्रा. मेहबूब मुजावर व अन्य मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.एन एस एस स्वयंसेवक विद्यार्थी विक्रांत माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

     प्रमुख पाहुणे प्रा. मेहबूब मुजावर  मार्गदर्शन करताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करीत डॉ. आंबेडकरांनी  दलित,शोषित व शेतकरी समाजाचे नेतृत्व केले होते. बाबासाहेब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असले तरी त्यांचे कार्य संपूर्ण विश्वासाठी होते.  त्यांना इंग्रजी व गणित याचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. जात धर्म पंथ याला छेद देत बहुजन समाजाच्या शेतकऱ्यासाठी आंदोलन करून त्यांनी खोती पद्धत रद्द केली. यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोक विचार व समाज परिवर्तन करणारा माणूस या अर्थाने त्यांच्याकडे पाहू लागले. त्यांचा जीवन पट आजच्या प्रत्येक घटकाला प्रेरणादायी व आदर्शवत आहे. डॉ. आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ साली झाला.

    डॉ. प्रभाकर माने अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, डॉ.आंबेडकर यांच्या कार्याची सखोल अभ्यास केला असता विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहता खरोखरच ते सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व व  खर्‍या अर्थाने ते विश्वरत्न आहेत.

    या कार्यक्रमात साने गुरुजी लिखित 'खरा तो एकची धर्म ! जगाला प्रेम अर्पावे' हे  गीत विक्रांत माळी यांनी सुरेल आवाजात सादर केले.

    तसेच या कार्यक्रमाचे सविस्तर आभार कु. नेहा राठोड यांनी मानले.  या कार्यक्रमामध्ये  २७ स्वयंसेविका व १० स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके सूत्रसंचालन सौंदर्या पोवार यांनी केले. तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती  मध्ये प्रा.डॉ.के.डी.खळदकर ,प्रा. चौगुले व कु.रुचिता कोठावळे हे मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा