Breaking

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

आणि कुंपणच खात होते शेत; आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी आरोग्य विभागातीलच अधिकारी बोटले - बडगिरे जोडीला अटक




      अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आरोग्यसेवक पदभरतीची परीक्षा जाहीर झाली, गाव खेड्यातील लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. पण ऐनवेळी पेपर फुटीची बातमी निघाली, आणि प्रामाणिक पणे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना धक्काच बसला. धक्कादायक बाबा म्हणजे चौकशी दरम्यान कुंपणच शेत खात असल्याची माहिती समोर आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मुंबईतील सहसंचालकपदावरील महेश बोटले आणि लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील प्रशांत बडगिरे या दोन मित्रांनी हा पेपर लीक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अटक झाली असून 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.


पेपरफुटीचे बिंग यामुळे आले बाहेर,

      आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेचा पेपर फोडून तो 20 जणांना पुरवून त्यांच्याकडून 1 कोटी रुपये कमावण्याचा डाव बोटले-बडगिरे जोडीने आखला होता. त्यांनी ज्यांना हा पेपर पुरविला त्यांनी तो अनेकांपर्यंत पोहच केला. त्यातून तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने पेपरफुटीचे हे बिंग बाहेर पडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
 
  

गट ‘क’चा पेपर फुटल्याची पडताळणी करणार

     महेश बोटले हा गट ‘क’ व गट ‘ड’ या पदाच्या भरतीसाठी असलेल्या लेखी परीक्षा पेपर समितीचा सदस्य आहे. बोटलेने गट ‘क’ व गट ‘ड’ हे दोन्ही पेपर पेनड्राईव्हमध्ये दिले होते. गट ‘ड’शिवाय इतर गटाच्या भरती परीक्षेत आणखी कोणत्या एजंटांना त्या परीक्षेचे पेपर दिले आहेत का, याचा तपास केला जाणार आहे. इतर कोणकोणत्या पदाच्या भरती परीक्षेसाठी बनविलेल्या समितीत त्याचा समावेश होता; तसेच इतर कोणती जबाबदारी दिलेली होती, त्या जबाबदारीदरम्यान त्याने स्वत:च्या फायद्यासाठी किती प्रकरणात उपयोग केला, याचा तपास करायचा असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी न्यायालयात सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा