Breaking

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

*महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध?आज नियमावली जाहीर होणार*

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे


मुंबई  : कोरोना महामारीने पुन्हा आपले डोके वर काढले असून महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

     गेल्या २४ तासांत मुंबईतील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ करोनाबाधित आढळले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री कोरोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली. त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता दाट आहे.

           याबाबत आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पुन्हा कोरोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

     कोरोना रुग्णसंख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात असून राज्यात गुरुवारी कोरोनाचे ११७९ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील रुग्णवाढ लक्षणीय आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ६०२ रुग्ण आढळले. मुंबईत बुधवारी ४९० रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा दोन महिन्यांतील उच्चांक होता. गुरुवारी त्यात मोठी भर पडली. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असली तरी राज्याच्या अन्य भागात अजून तरी तेवढी वाढ झालेली नाही. दिवसभरात पुणे जिल्हा १८४, नगर ४४, मराठवाडा २७, विदर्भ १८ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या ७,८९८ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.


स्थानिक पातळीवर निर्बंध?


नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांवर ओमायक्रॉनचे सावट आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याबाबत विचार करा, अशी सूचना केंद्र सरकारने गुरुवारी राज्यांना केली. मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळणारी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करावीत आणि करोनाबाधितांचे प्रमाण, रुग्णदुपटीचा दर यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. तसेच निवडणुका तोंडावर आलेल्या राज्यांत लसीकरण मोहिमेला वेग देण्याची सूचना केंद्राने केली.

    केंद्र सरकारच्या आवाहनानुसार राज्याच्या गृहविभागाने चर्चमध्ये क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी असेल, असे गुरुवारी स्पष्ट केले. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आदी वस्तू ठेवल्या जातात. यावेळी अंतरनियमासह करोना नियमांचे पालन करावे, मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट केले.

  कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ ठाणे महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण गुरुवारी आढळला. ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे.

      पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात येईल.  ओमायक्रॉनचे २३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची ओमायक्रॉन रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांपैकी १६ हे आंतरराष्ट्रीय प्रवासी असून, सात जण हे त्यांच्या सहवासातील आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी सहाजण आखाती देश, चार जण युरोप, दक्षिण अफ्रिका आणि घाना प्रत्येकी दोन, सिंगापूर व टांझानियातून प्रवास केलेला प्रत्येकी एक जण ओमायक्रॉनबाधित आढळला आहे.

   कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी कोरोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा