कोल्हापूर: तांत्रिक कामासाठी उघडण्यात आलेला राधानगरी धरणाचा (Radhanagari Dam) दरवाजा पुन्हा बंद करताना अडकल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर (Kolhapur) शहरातही पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं प्रशासन सावध झालं आहे.
जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले आहे. दरवाज्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्रात वाढ झाली असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणे टाळावे अशा असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहर, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने नंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राधानगरीतून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळं पाण्याची पातळी तीन ते चार फुटाने वाढू शकते. संध्याकाळपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे . धरणाच्या दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळं नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूरकरांना केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा