Breaking

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

*"जयसिंगपूर कॉलेजच्या प्र.प्राचार्यपदी पहिल्यांदाच मिळाले एका महिला प्राध्यापिकेला स्थान : प्र.प्राचार्यपदी प्रा.डॉ.सौ.मनिषा विनोद काळे या विराजमान"*


प्र. प्राचार्य प्रो.डॉ. सौ. मनिषा विनोद काळे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


   जयसिंगपूर कॉलेजच्या 62 वर्षांच्या शैक्षणिक प्रवास व  इतिहासात पहिल्यांदाच प्राचार्यपदी विराजमान  होण्याचा बहुमान एका महिला प्राध्यापिकेला अर्थात प्रा.डॉ.सौ.मनिषा विनोद काळे यांच्या रूपाने मिळाला आहे. माजी प्र.प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांची दुसर्‍या महाविद्यालयात प्राचार्यपदी वर्णी लागली असल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी सर्व पातळीवर परिपूर्ण व पात्र म्हणून डॉ.सौ.मनिषा काळे या आहेत. साहजिकच त्यांची सेवाजेष्ठता व गुणवत्तेचा विचार करिता त्यांची महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी निवड झाली आहे.

        प्रा.डॉ.सौ.मनिषा विनोद काळे या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथे बॉटनी विषयाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख म्हणून सेवेत कार्यरत आहेत. त्यांचा अध्यापनाचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या संशोधनात्मक कार्यासाठी त्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात त्यांचे लौकिक  असून त्यांनी  ७ नॅशनल अवॉर्ड प्राप्त केले आहेत. त्यांच्या या संशोधनात्मक कार्याचा भाग म्हणूनच १ मेजर व १ मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण करून संशोधनात्मक कार्य मजबूत केले आहे. जवळपास ४० आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सेमिनार व कार्यशाळामध्ये पेपर सादरीकरण व सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

विविध सामाजिक उपक्रमात सहभाग

     डॉ. मनिषा काळे यांच्या संशोधनात्मक कार्यातील उल्लेखनीय कार्य म्हणजे 'बायो इथेनॉल प्रोडक्शन फ्रॉम डेअरी वेस्ट वॉटर' या विषयावर त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे.तसेच शैक्षणिक धुरा सांभाळताना २ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादित केली आहे. संशोधनात्मक कार्याबरोबर लेखन कला अवगत असल्यामुळे  त्यांचे २ औषधीय वनस्पतीवर आधारित पुस्तके प्रकाशित झाले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. डॉ.काळे यांनी 'महिला सबलीकरण व वनस्पतीशास्त्र' या विषयाच्या अनुषंगाने शेकडो व्याख्याने दिली आहेत. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक वातावरण निर्मिती व उल्लेखनीय कार्य सातत्याने केले आहे.त्याचबरोबर विद्यापीठ व महाविद्यालयाच्या विविध समित्या व एक महिला प्राध्यापक म्हणून त्यांनी नेत्रदीपक कार्य केले आहे.

       डॉ. मनिषा काळे यांनी महाविद्यालयात स्‍वकर्तृत्‍वातून नक्षत्र गार्डनची निर्मिती करून  दुर्मिळ अशा असंख्य वनस्पतींचे रोपन करून त्या त्या वनस्पतींचे संवर्धन केले आहे. त्यांच्या या कामाबद्दल 'कोल्हापूर गार्डन क्लबच्या' वतीने विशेष सन्मान पुरस्कार २०१९ त्यांना मिळाला आहे. डॉ.मनिषा मॅडम यांनी  शिवाजी विद्यापीठाच्या धर्तीवर 'बोटॅनिकल गार्डन' बनविले असून  त्यामध्ये जैवविविधता अभ्यास केंद्राची निर्मिती केली आहे.त्यामध्ये जवळपास २०० औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. त्यांनी आपले कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता  आपल्या संशोधनात्मक  व विषयाची व्याप्ती वाढावी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या त्याचबरोबर आणि विद्यापीठात ही वृक्षसंवर्धन व औषधी वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी ते हिरीरीने सहभागी होत असतात. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याचे  योगदान ही खूप मोलाचा आहे. त्यांनी स्वेच्छेने 'सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत'जयसिंगपूर शहरातील २ मुली शैक्षणिक दत्तक घेतल्या आहेत. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रोटरी क्लब जयसिंगपूरद्वारे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानी या अगोदरही सन्मानित झाल्या आहेत. सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता नाचणीच्या श्रावण बाळ विकलांग संस्थेस अन्नधान्याच्या माध्यमातून मदत, जागतिक एड्स दिनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष  सहभाग, तसेच कालवश राज बाबर यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक व नैतिक आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. 

   एक महिला म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटकाला अभिमान वाटावे असे डॉ.मनिषा काळे यांचे  कार्य सर्वांना ज्ञात आहे. त्यांना मिळालेला प्राचार्यपद आजच्या आधुनिक काळातील मनिषा रुपी सावित्रीला मिळाल्यासारखा आहे. 

    जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना त्या म्हणाल्या की, मला मिळालेला हे पद अखंड स्त्री जातीचा मान सन्मान आहे. महिलांचा सन्मान राखीत महाविद्यालयाच्या एकूणच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तापूर्ण विकासासाठी कटिबद्ध आहे. संस्था, प्राध्यापक वर्ग,प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधून कॉलेज व संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. संस्थेने हे पद देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहून जबाबदारीने विद्यार्थी व कॉलेज हितार्थ सर्वकष काम करणार आहे अशा त्या म्हणाल्या.

     आज तागायत त्यांनी जयसिंगपूर कॉलेजच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिले आहे. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२१ या पुरस्कारांनी ते सन्मानित झाल्या आहेत. त्यांच्या या पुरस्काराने विद्यार्थिनी प्रेरित होऊन उत्तुंग कार्य करण्यास त्यांना बळ मिळेल.

     एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पाहता अत्यंत संयमी, सरळ मार्गी, संवेदनशील मात्र विचार व तत्वांशी एकनिष्ठ, सांस्कृतिक कलाप्रेमी, निसर्गप्रेमी व आनंदी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

      प्राचार्यपदी विराजमान झाल्यानंतर समस्त विद्यार्थी, प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी ,माजी विद्यार्थी व समस्त घटकाकडून त्यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

२ टिप्पण्या:

  1. नमस्कार सर, तुमच्या बातमीच्या माध्यमातून प्राचार्या डॉ . काळे मॅडम यांच्याविषयी ची अपरिचित सामाजिक दायित्वची चांगली माहिती मिळाली.धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा