Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

*मराठी भाषा ही संस्कृतपासून निर्माण झालेली नाही : डॉ. गोमटेश्वर पाटील*


प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील


*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


रुकडी (दि. २५) : " वेदकाळात संस्कृत बोलणारे माणसे होती तशी मराठी बोलणारे माणसेही होती. संस्कृतमधील फक्त दहा टक्के शब्द मराठीत आहेत. त्यामुळे संस्कृतीपासून मराठीचा उद्भव झाला असे म्हणणे चुकीचे ठरेल. मराठी ही संस्कृतीपासून नव्हे तर महाराष्ट्रीपासून निर्माण झालेली स्वतंत्र भाषा आहे." ,असे मत महावीर महाविद्यालयातील डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी व्यक्त केले. ते राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा ,कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलत होते. 

       अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते.'मराठी भाषा अभिजात कशी?' या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. लता मोरे यांनी केले. द. म. सा. चे सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी भूमिका मांडली. आपल्या व्याख्यानात डॉ. पाटील पुढे म्हणाले ," मराठी साहित्याचा आरंभ हा विवेकसिंधुकार मुकुंदराज यांच्यापासून मानली जाते. मात्र त्यापूर्वी किती तरी वर्षांपासून ग्रंथरचनेचे काम सुरू होते. लीळाचरित्र येण्यापूर्वी हलराजाने 'गाथासप्तशती' च्या माध्यमातून हे काम केले आहे. त्यापूर्वीही महाराष्ट्री प्राकृतमधून ग्रंथरचना होत होती. हा अभ्यास संशोधकांनी नव्याने मांडणे आवश्यक आहे. संस्कृतोद्भव मराठी हा सिद्धांत बदलून घेतला पाहिजे.  तरच मराठी भाषा ही अभिजात ठरू शकेल."

       अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले," मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी ही केवळ मराठीच्या प्राध्यापकाची नाही, सर्वसामान्य माणसे, शालेय विद्यार्थी आणि मराठी भाषा बोलणारे इतर विषयांच्या शिक्षकांनीही त्यासाठी योगदान दिले पाहिजे. "

शेवटी डॉ. शंकर दळवी यांनी आभार मानले तर डॉ. गिरीश मोरे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा