Breaking

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

*जयसिंगपूरातील रेशन धान्य दुकानांवर कारवाई : परिसरात एकच खळबळ*


जयसिंगपूरातील बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई


   जयसिंगपूर  : येथील जयसिंगपूर विकास सोसायटीच्या रेशन धान्य दुकान क्रमांक २, ३ व ५ या तीन दुकानांत बेकायदेशीर धान्य बाहेर नेऊन काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार कोल्हापूर येथील परिवर्तन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी उघडकीस आणला. तसेच या दुकानांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. सरतेशेवटी मंगळवारी सदर रेशन धान्य दुकानांची अनामत रक्‍कम जप्त करून परवाने रद्द केल्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी मादत्तात्रय कवितके यांनी केली.

     याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी, येथील जयसिंगपूर विकास सोसायटीच्या रेशन धान्य दुकान क्रमांक २, ३ व ५ या तीन दुकानांतून बोलेरो टेम्पोतून रेशन धान्याची पोती बाहेर विकण्यासाठी जात असताना त्याचे व्हिडीओ चित्रीकरण कोल्हापूर येथील परिवर्तन संघटनेने केले होते. याबाबतचे सर्व अधिकृत पुरावे तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे देऊन तातडीने दुकानांची तपासणी करण्याची मागणी परिर्वतन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी धरली. सदर तपासात  तांदूळ ४१.११ क्‍विंटल व गहू २९.७९ क्‍विंटल इतका साठा अतिरिक्‍त असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रशासनाने टेम्पोचालक व सेल्समन जितेंद्र गुप्ता यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला.

       या सर्व कारभाराचा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे सादर केला होता. शिवाय हे धान्य जांभळी येथील आटा चक्‍की कंपनीत माल पोहचला कसा यासह विविध प्रश्न समोर आले होते. त्यानंतर या दुकानांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी मंगळवारी तिन्ही रेशन धान्य दुकानांची अनामत रक्‍कम जप्त करून परवाने रद्द केले.

      सदर मोठी कारवाईने जयसिंगपूर व शिरोळ तालुक्यात खळबळ माजली आहे.मात्र कोल्हापूरच्या परिवर्तन संघटनेचे सर्व घटकाकडून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा