Breaking

रविवार, ३० जानेवारी, २०२२

*खरे साहित्य कालातीत असते : माजी प्र.प्राचार्य डॉ. सुभाष शेळके*

 

वांड्मय मंडळाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना
डॉ. सुभाष शेळके


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


मिरज : येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात वाड्:मय मंडळाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे माजी प्र. प्राचार्य डॉ. सुभाष शेळके म्हणाले की, खरे साहित्य हे नेहमी कालातीत असते. साहित्य ही व्यापक संकल्पना आहे . केवळ एका विशिष्ट भाषेची अथवा भाषा गटाची मक्तेदारी साहित्याला संमत नसते. भाषा, जात-पात, पंथ, संस्कृती, भौगोलिक सीमारेषा या सर्वांच्या पलिकडे ते पोहोचलेले असते. म्हणूनच ते वैश्विक बनते. 'ग्रामीण' किंवा 'शहरी', 'प्राचीन' किंवा 'अर्वाचीन' असे कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण साहित्याला अभिप्रेत असूच शकत नाही. साहित्य जीवनानुभवांचे यथार्थ चित्रण रसिकांसमोर मांडत असते. म्हणूनच ते सर्वांचे असते. जीवनाच्या गुंतागुंतीचे 'आकलन' आणि 'अनाकलन', 'सुबोधता' आणि 'दुर्बोधता' यांच्या सीमारेषा कधीकधी धुसर तर कधी कधी अधिकाधिक गडद होत जातात. त्यातून जीवनात संघर्ष आकाराला येतो. या मानवी जीवनातील अंतर्बाह्य संघर्षाचे चित्रण कसदार साहित्यामध्ये झालेले आपल्यास पाहायला मिळते. आपल्या भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी वांड्मय मंडळाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे असे आवाहन केले.

          आपल्या भाषणाच्या उत्तरारार्धात त्यांनी विविध साहित्य प्रकारांचा परिचय आपल्या ओघवत्या शैलीत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

   कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य प्रो.डॉ. जे. एल. भोसले यांनी त्यांच्या मनोगतात विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की विध्यार्थी व शिक्षक यांनी संत साहित्याचा , श्रीमद्भभगवद् गीतेचा अभ्यास केला पाहिजे. जीवनाची उत्कृष्ठ जीवनमूल्ये अश्या प्रकारच्या साहित्यातून आपल्यास शिकायला मिळतात.

       या प्रसंगी महाविद्यालयाच्या कु. राधिका जाधव, कु. मयुरी कुंभार आणि कु. रेवती लोंढे यांनी विविध स्पर्धांमध्ये धवल यश संपादन केल्याबद्दल साहित्य मंडळ व महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

     वाड्:मय मंडळ प्रमुख डॉ. लीलावती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सदर मंडळाची उद्दिष्टे स्पष्ट करुन पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, त्यानी सृजनशील साहित्याची निर्मिती करावी यासाठी या मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालय नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे मत त्यानी व्यक्त केले. प्रा. वाय. एस. गायकवाड यानी आभार व्यक्त केले. डॉ. सौ. पुष्पा पाटील व प्रा. सौ सुरेखा हेरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास सकाळ सत्र प्रमुख प्रा. विक्रम भोसले, लेफ्टनंट प्रा. दिगंबर नागर्थवार, तसेच महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कोविड प्रसार प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा