Breaking

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

*डिजिटल करन्सी म्हणजे काय? क्रिप्टो करेंसी व डिजिटल करन्सी यामध्ये काय फरक आहे?*

 

डिजिटल मुद्रा अंदाज पत्रक - 2022-23


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*

प्रमुख,अर्थशास्त्र विभाग 

जयसिंगपूर कॉलेज ,जयसिंगपूर


     सन २०२२-२०२३ चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. त्यामधून उलट-सुलट चर्चेला वाव मिळाला मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे 'डिजिटल रुपया' होय. याबाबत नेमकेपणाने सीतारामन भाषणात काय म्हणाल्या, २०२२ मध्ये रिझर्व ब्लॉकचेन आणि बाकीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रुपया आणणार आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की ,काही दिवस टीव्ही व इतर माध्यमावर सातत्याने  वेगवेगळ्या डिजिटल करन्सीच्या जाहिराती भरपूर पाहायला मिळत आहात. मात्र आता भारत सरकारचे डिजिटल रुपया त्यांच्यापेक्षा वेगळे असणारे का? सरकारने हे आत्ताच पाऊल का उचलले? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे येणार आहे.

       डिजिटल करन्सी किंवा मुद्रा म्हणजे नेमकं काय? (विश्वकोशातील व्याख्या) डिजिटल चलन म्हणजे कोणतेही चलन, पैसा किंवा पैशासारखी मालमत्ता जी प्रामुख्याने डिजिटल संगणक प्रणालीवर व्यवस्थापित, संग्रहित किंवा एक्सचेंज केली जाते, विशेषत: इंटरनेटवर. डिजिटल चलनांच्या प्रकारांमध्ये क्रिप्टोकरन्सी, आभासी चलन आणि सेंट्रल बँक डिजिटल चलन यांचा समावेश होतो.  हे चलन आपल्याला इतर चलना सारखे म्हणजेच नाणे किंवा नोटा सारखे हातात धरता येत नाही हे चलन तुमच्या खात्यातल्या पैशा सारखंच असतं पण ते दुकानात घेऊन त्याच्या बदल्यात तुम्ही सामान विकत घेऊ शकत नाही.

      जुलै २०२१, मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटलं होतं की, भारताचे स्वतःचं डिजिटल चलन बनवण्यासाठी जे काम करतात  ज्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी(CBDC) असे म्हटले जाईल आणि तुम्ही एका रुपयाच्या बदल्यात एक CBDC विकत घेऊ शकता. तुमचा हा डिजिटल रूपया तुम्ही फक्त ऑनलाइन स्टोअरमध्ये खर्च करू शकता. याची गरज काय? खरंखुरं चलन छापायला तसेच बाजारात आणायला सरकारला प्रत्येक रुपया मागे काही ना काही खर्च येतो पण जर त्याच मूल्याचे डिजिटल चलन आणलं तर त्याचा छपाईचा खर्च सरकारला करावा लागत नाही. या डिजिटल रुपयाद्वारे खरेदी-विक्रीसाठी एक सुरक्षित नेटवर्क उभा करण्याचा फक्त खर्च येईल पण नाणी किंवा पैसा निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी असेल असे या विषयासंदर्भातील तज्ञ व जाणकार सांगत आहेत.

     डिजिटल रुपया हे रिझर्व बँकद्वारे जारी केले जाईल. त्यामुळे ते सरकारच्या अखत्यारीतील एक अधिकृत चलन असेल त्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदी-विक्रीसाठी क्रिप्टो करेंसी सारख्या छुप्या मार्गांचा वापर कमी होईल अशी सरकारला आशा आहे. आपल्याला माहिती आहे की, क्रिप्टो करेंसी म्हणजे एक प्रकारचं डिजिटल चलन मात्र ते कुठल्याच केंद्रीय बँक किंवा सरकारी यंत्रणे ऐवजी जगभरात एकाच पातळीवर मॅनेज केले जाते.त्यामुळे त्याला डीसेंट्रललायझसन फायनान्शिअल टोकन असं म्हटलं जातं. केंद्रीय नियंत्रणाशिवाय जगभरात एक सारखेच चलन असावे असा त्यामागचा उद्देश आहे. बिटकॉइन, ईथर व फायनान्स हे त्याचे ठळक उदाहरणे आहेत. या क्रिप्टो करेंसी चे मूल्य लाखो मध्ये असू शकते आणि ते कधीही वरखाली होऊ शकते.सध्या अधिकाधिक भारतीय लोक हे बिटकॉइंन यासारख्या इतर क्रिप्टो करेंसीकडे आकर्षित होताना दिसतात. बिटकॉइन मध्ये व्यवहार करणारे अनेक एक्सचेंज स्थापन झालेत पण सहसा हे व्यवहार परकीय चलनात म्हणजे डॉलर पाहून करावे लागतात. याचा वापर अनेकदा आर्ट कलेक्शन पासून त्या आलिशान गाड्या सारख्या महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. पण डार्क वेबवर  गेलात तर शस्त्रास्त्र व ड्रग खरेदी सारख्या बेकायदेशीर कामांसाठी सुद्धा याचा वापर होतो. त्यामुळे जगातील अनेक राष्ट्रांनी याला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये सिडनी डायलॉग परिषदेत पंतप्रधान मोदींनी क्रिप्टो करेंसी चुकीच्या हातात पडून तरुणांचा नुकसान होईल याबद्दल योग्य काळजी व्यक्त केली होती. या अर्थसंकल्पात रुपया डिजिटल करण्याची घोषणा म्हणजे भारत सरकारचा तरुणांना क्रिप्टो करेंसीपासून दूर करण्याचा प्रयत्न असल्याचं तज्ञांचे मत आहे. त्यामुळेच की काय अर्थसंकल्पात आणखीन एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे क्रिप्टो करेंसी आणि इतर डिजिटल संपत्ती मधून मिळणाऱ्या नफ्यावर सुद्धा आता सरसकट ३०% कर द्यावा लागणार आहे. यासाठी यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही. आता सरकार या चलनासाठी सुद्धा ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरणार आहे.या क्षेत्रातील तज्ञांनी विशेष बोलताना म्हटलं की, हे चलन प्रोग्राम म्हणजे ज्या उद्देशासाठी दिले त्यावरच खर्च करता यावं अशा स्वरूपाचा असू शकतं या सध्या चीनच्या दोन शहरांमध्ये असा प्रयोग सुरू आहे. पुढे जाऊन असंही वाटतं की सरकार क्रिप्टो करेंसीवर बंदी आणण्याच्या कुठलाही विचारत नाहीये कारण त्यातून कर गोळा करण्याची घोषणा त्यांनी केली. डिजिटल रुपयाचं स्वरूप येत्या काही काळात स्पष्ट होईल. मात्र गुंतवणूकदारानी यापुढे कोणतेही आर्थिक व्यवहार करताना तुमच्या विश्वासातल्या तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

    सरतेशेवटी, येत्या काळात  डिजिटल करन्सीचे वास्तव स्वरूप, मुख्य उद्देश व फायदे-तोटे लक्षात येतील यावरच डिजिटल करन्सीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा