Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

*शिरोळ मध्ये शब्दगंध साहित्य परिषदतर्फे दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन*

 

शिरोळ मध्ये साहित्य संमेलन

*मालोजीराव माने :  कार्यकारी संपादक*


       शिरोळ परिसरात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ जोमाने वाढत आहे. समाजातील वास्तवतेचे लिखाण झाले पाहिजे यासाठी साहित्य संमेलन ही पर्वणी असते. दलितमित्र व दीनबंधू भाई दिनकरराव यादव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणारे साहित्य संमेलन नवचैतन्याबरोबरच बळ देण्याचे काम करीत आहे. अस्वस्थ वर्तमानाला भिडताना लेखकाने स्वतःची लेखन शैली विकसित करावी, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, ख्यातनाम समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. शिरोळ  येथील शब्दगंध साहित्य परिषद तर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून डॉ. शिंदे बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील (आबाजी) हे उपस्थित होते.


         साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. यावेळी बोलताना विश्वासराव पाटील म्हणाले, दीनबंधू भाई दिनकरराव यादव यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आदर्शवत कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य दीपस्तंभासारखे आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य राहील.संमेलनात जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार, कादंबरी लेखक व सामाजिक कार्यकर्ते सुनील इनामदार यांना तसेच कै.भाई दिनकरराव यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन राष्ट्रीय हॉकी खेळाडू सुस्मिता संजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन भीमराव धुळूबुळू आणि प्रा. अनिल कुंभार यांनी केले.

          संमेलनाचे स्वागताध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सुनील इनामदार आणि सुस्मिता पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले.यावेळी पेर्ते व्हा प्रकाशनाचे कवी, शाहीर विष्णू पाटील लिखीत 'गीतगंगा' हा काव्यसंग्रह डॉ. रणधीर शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रारंभी स्वागत शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष दगडू माने यांनी तर प्रास्ताविक विश्वनाथ बन्ने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संजय सुतार यांनी करून दिला. पद्माराजे विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि स्फूर्ती गीत सादर केले. सूत्रसंचालन किरण पाटील तर आभार संजय सुतार यांनी मानले. यावेळी श्री दत्तचे संचालक अनिलराव यादव, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, समाजवादी प्रबोधीनीचे प्रसाद कुलकर्णी, माजी सरपंच गजानन संकपाळ, प्रा. संजय पाटील, प्रा. मोहन पाटील, शंतनू यादव,  नगरसेवक इम्रान अत्तार, राजाराम कोळी, सौ. विदुला यादव, विजय आरगे, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, बाळासाहेब कोळी, धनाजी पाटील नरदेकर, संजयसिंह यादव, संभाजीराव यादव, अरविंदराव यादव, विराजसिंह यादव, सचिन इनामदार, उल्हास पाटील, फिरोज मुजावर, नामदेव भोसले, भगवान कोळी, गोरखनाथ माने, पंडितराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा