Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

*लग्न न होण्याच्या नैराश्यातून नांदणीच्या तरुणाने केली आत्महत्या*

 

नांदणीमध्ये एका युवकाची आत्महत्या


*मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक*


शिरोळ ः   शिरोळ तालुक्यातील नांदणी याठिकाणी एका ३० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.लग्न जुळत नसल्याच्या वैफल्यग्रस्त झाल्याने त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सोमवारी सकाळी ही आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

   प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सदर अनुप आपगोंडा पाटील वय वर्ष ३० असून  शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील रहिवासी आहे. मागील काही काळापासून अनुप याचं लग्न जुळत नव्हतं. वयाची 30 वर्षे झाली असताना देखील आपलं लग्न जुळत नाही, म्हणून अनुपला नैराश्य आलं होतं.यातूनच त्यानं आपल्या राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत लोखंडी अँगलला बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

       सोमवारी सकाळी उशिरापर्यंत मुलगा खाली न आल्याने १०.४५ च्या सुमारास कुटुंबीयांनी अनुपच्या खोलीत जाऊन पाहणी केली. यावेळी अनुप घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. अनुपने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

     शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास शिरोळ पोलिस करीत आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा