कर्मचाऱ्याने जमवली कोटीची माया |
दिल्ली : देशात नेमकं कधीकधी काय घडतं हे कळतही नाही असेच एक आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडली. उज्जैनमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरू झाली. या कारवाई दरम्यान कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला.विशेष म्हणजे सदर व्यवस्थापकाचा पगार केवळ १८ हजार रुपये आहे.
आरोपी गोविंद बागवाननं काळ्या पैशाच्या माध्यमातून २९ एकर जमीन खरेदी केली. छापेमारी दरम्यान ईओडब्ल्यूच्या पथकाला चार घरांची माहिती मिळाली. या घरांची किंमत लाखोंमध्ये आहे. अतिशय आलिशान पद्धतीनं त्यांची बांधणी करण्यात आली आहे. १८ हजार रुपये पगारातून गोविंद बागवान यांनी इतकी मालमत्ता कशी काय उभारली असा प्रश्न पथकाला पडला आहे.
पत्नी आणि मुलाच्या नावावर देखील बागवान यांनी बरीच संपत्ती ठेवली आहे. बागवानकडे २९ एकर जमीन आहे. तिची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते. यासोबतच सोन्या चांदीचे दागिनेही घरात सापडले आहेत. घरातून ईओडब्ल्यूच्या पथकाला रोख रक्कमदेखील सापडली आहे. बागवान यांची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. बागवाननं अनेक पॉलिसी काढल्या आहेत. त्याचीही कागदपत्रं घरात सापडली आहेत.
गोविंद बागवानच्या घरात खोटी कागदपत्रंदेखील सापडली आहेत. छापेमारी दरम्यान ईओडब्ल्यूच्या पथकानं घरातून बोगस पॅन कार्ड, मतदार ओळखपत्रं जप्त केली. या प्रकरणी बागवान विरोधात वेगळा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. ईओडब्ल्यूचे डीएसपी व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून या मागील वास्तवता जाणून घेण्यासाठी अधिक सखोल तपास सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा