इचलकंरजी शहरात सुरेश गडगे यांची हत्या |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
इचलकरंजी : शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश आण्णा गडगे वय वर्ष ५७ यांचा काल मंगळवारी धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना स्वामी अपार्टमेंट परिसरात घडली. या खुनाच्या घटनेमुळे शहरात खेद व संतप्त व्यक्त केला जात आहे. संशयित आरोपी श्रवणकुमार दायमा रा.स्वामी अपार्टमेंट जवळ इचलकरंजी यास सुमारे चार तासांनी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली. अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे आपल्या राहत्या घरी स्वामी अपार्टमेंट जवळ घराखाली रात्री जेवणानंतर नियमितपणे मोकाट कुत्र्यांना बिस्किट घालत होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. मात्र मानेवर चाकू सारख्या धारदार हत्याराने एकच वार केल्याने वार वर्मी बसला. ते कोसळले त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या मुलासह नागरिकांनी धाव घेतली त्यामुळे संशयित आरोपी दायमाने तेथून पलायन केले.गंभीर जखमी झालेल्या गडगे यांना उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यकर्ते गडगे यांच्या खुनाची घटना कळताच शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालयात धाव घेतली. सदर घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट देऊन पाहणी केली व सुरेश गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माजी अध्यक्ष होते.पोलिसांनी आरोपीला चार तासात गजाआड केले. सदर संशयित आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविला असता वैयक्तिक वादातून खून केल्याचे संशयित आरोपीने सांगितले. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.
इचलकरंजी शहरात खुन्याच्या वाढत्या घटना घडत असल्याने लोकांच्या मध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होत असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा