Breaking

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवाजी महाराज आणि मुस्लिम...


जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज



               प्रा. इम्रान मणेर ,समन्वयक

एकलव्य करिअर अकॅडमी, जयसिंगपूर

E-mail : imranmaner@gmail.com

Mob : 9923292346


      वाचक मित्रहो, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आजच्या लेखात आपण शिवरायांची मुस्लिम समाज व मावळ्यांबद्दलची भूमिका व दृष्टिकोन पाहणार आहोत.  तसेच स्वराज्याच्या निर्मितीसाठी महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यात मुस्लिमांच्या योगदानाचा हा एक छोटासा परिचय करून देण्याचा प्रयत्न.

      शिवराय हे एक धर्मनिरपेक्ष राजा होते. स्वराज्याच्या उभारणीमध्ये हिंदू तसेच मुस्लिम मावळ्यांचा मोठा सहभाग आहे. मात्र वेगवेगळ्या वैचारिक गटांनी शिवरायांना आपापल्या रंगांनी रंगवलेले आहे आणि दुर्दैवाने त्यामध्ये काही धर्मांध लोकांना यशही मिळाले. त्यांनी शिवरायांची प्रतिमा इतकी विकृत केली की त्यांना जवळजवळ देवाचा अवतार मानले, शिवरायांची भूमिका ही "हिंदू लोकांना मुस्लिम शासकांच्या जुलमापासून वाचवण्यासाठी जन्म घेतला." अशी बनवली आणि सत्यापासून लोकांना दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. शिवरायांचे कोणतेही धोरण कधीही धार्मिक नव्हते तर ते राजकीय व स्वराज्य निर्माण करण्यासाठी होते. स्वराज्याच्या शेजारील बहुतेक राज्यांवर मुस्लिम नेत्यांची सत्ता होती. स्वराज्य निर्माण करण्यासाठी या सर्वांशी लढावे लागले, परंतु हा सर्व संघर्ष व लढाया ह्या राजकीय स्वरूपाच्या होत्या धार्मिक नव्हे. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकांची संख्या मोठी होती तर दुसरीकडे शत्रु सैन्यांचा मोठा भाग हिंदूही होता. अनेक मुस्लिम विरोधी इतिहासकारांनी त्यांना मुस्लिमविरोधी आणि इस्लामविरोधी म्हणून चित्रित केले आहे आणि ही संकल्पना भारतातील काही राजकारण्यांनी, विशेषत: महाराष्ट्रातील त्यांच्या मुस्लिम विरोधी प्रचारासाठी वापरली होती. पक्षपाती इतिहासकारांनी खोटा इतिहास लिहिला की ज्यामुळे भारतात 20 व्या शतकातही जातीय युद्धे आणि हिंदू आणि मुस्लिमांमधील वाद निर्माण झाला आहे. 

      छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी राजा होते का? नक्कीच नाही, कारण जेव्हा आपण या महान राजाच्या जीवनाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की त्याचे बरेच सैन्य अधिकारी आणि सहकारी कट्टर मुस्लिम होते. वस्तुस्थिती अशी आहे की, राजाने आपल्या नौदल आणि तोफखानासह अनेक खात्यांमध्ये सर्वोच्च पदांवर मुस्लिमांची नियुक्ती केली होती. शिवाय त्यांचे अनेक अंगरक्षक मुस्लिम समाजातील होते. येथे या गोष्टी स्पष्टपणे सांगतात की शिवराय हे मुस्लिम विरोधी राजा नव्हते.

      शिवारायांचे युद्ध मुघल सम्राट औरंगजेब आणि विजापूरचा सुलतान आदिलशाह यांच्याविरुद्ध होते.  राजाचे हे दोन्ही शत्रू मुस्लिम असले तरी त्याचा अर्थ शिवराय मुस्लिमविरोधी होते असे नाही.  स्वराज्याविरुद्ध लढलेल्या औरंगजेबाच्या सैन्यात प्रामुख्याने राजपूत हिंदूंचा समावेश होता हे उल्लेखनीय.  दुसरीकडे, आदिलशहाच्या सैन्यात जे शिवाजी महाराजांविरुद्ध लढले होते त्यात प्रामुख्याने दख्खनच्या हिंदूंचा समावेश होता. त्याशिवाय औरंगजेब आणि आदिलशाह हे दोघेही मित्र नव्हते तर एकमेकांचे शत्रू होते.

      महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मुस्लिम संतांचा आदर केला. याकूत बाबा, एक सुफी मुस्लिम संत हे राजाच्या आध्यात्मिक मार्गदर्शकांपैकी एक होते. त्यांनी आपल्या हिंदू सैनिकांना आदेश दिला होता की, मुस्लिम स्त्रिया आणि मुलींशी गैरवर्तन करू नये, मशिदींना संरक्षण दिले जावे आणि छापे चालू असताना जर त्यांना कुराणाची प्रत सापडली तर त्यांनी ती आदरपूर्वक त्यांच्या मुस्लिम सहकाऱ्यांना द्यावी.

      आता, राजाचे मुस्लिम योद्धे आणि सहकारी यांच्याबद्दल जाणून घेणे रोमांचक ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सैनिकांचा मोठा भाग मुस्लिमांचा होता. सैन्यात मुस्लिमांची भरती करण्याचे सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे 800 पठाणांची तुकडी, जे विजापूरच्या आदिलशहाचे सैन्य सोडून स्वराज्यामध्ये सामील झाले होते. शिवरायांचे राज्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरले होते. समुद्रमार्गे होणाऱ्या कोणत्याही आक्रमणापासून स्वराज्याचे रक्षण करणे आवश्यक होते, म्हणून त्यांनी स्वतःचे नौदल तयार केले. दर्यासारंग यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली. शिवाय नौदलातील बहुतेक खलाशी मुस्लिम आणि मच्छीमार होते. राजे हे पारंपरिक युद्ध पद्धतीवर अवलंबून नव्हते, त्यांनी नेहमीच लष्कराचे आधुनिकीकरण केले. त्यांनी आपल्या सैन्यात तोफखाना विभाग सुरू केला व इब्राहिम खान यांची तोफखाना प्रमुख म्हणून नियुक्ती केली. येथेही आपण पाहतो की, त्याच्या तोफखान्यातील बहुतेक सैनिक मुस्लिम समाजातील होते. घोडदळ हा सैन्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग होता. घोडदळामध्ये सुमारे 66 हजार सैनिक मुस्लिम होते.

      सिद्धी हिलाल हा सैन्यातील आणखी एक शूर मुस्लिम सरदार होता. राजे पन्हाळा किल्ल्यावर असताना, आदिलशहाच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला. राजांना वाचवण्यासाठी सैन्यातील एक प्रसिद्ध सरदार नेताजी पालकर यांनी शत्रूवर हल्ला केला. नेताजी पालकर यांच्यासोबत सिद्धी हिलाल होते. या युद्धात सिद्धी हिलाल यांचा मुलगा सिद्धी वाहवाह गंभीर जखमी झाला. नेसरीच्या लढाईत सिद्धी हिलाल मारला गेला. 15 हजार सैन्याचे बळ असलेला आदिलशहाचा सेनापती बहलोल खान याला पकडण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या सेनापती प्रतापराव गुजरला दिला. तेव्हा प्रतापराव गुजर यांना समजले की आपल्या 1200 घोडदळांसह हे शक्य नाही. "बहलोलखानाला पकडल्याशिवाय तोंड दाखवू नका" असे राजांनी प्रतापरावांना बजावले होते, त्यामुळे प्रतापरावांनी आपल्या घोडदळांना अडचणीत न आणण्याचा निर्णय घेतला व आपल्या सहा सरदारांसह बहलोल खानच्या बलाढ्य सैन्यावर आत्मघातकी हल्ला केला.  हे 7 पुरुष 7 शूर मराठा म्हणून ओळखले जातात, त्यापैकी एक सिद्धी हिलाल होता. अफजलखान भेटीच्या वेळी काझी हैदर हे राजांचे वकील होते, जे नंतर सचिव झाले. प्रतापगडावर राजे अफझलखानाला भेटले तेव्हा शिवरायांना रुस्तुमे जमाल याने दिलेल्या वाघनख्या अत्यंत उपयुक्त ठरल्या. या भेटीत राजांसोबत 3 अंगरक्षक होते, सिद्दी इब्राहिम त्यापैकी एक होता. 

      मुस्लिम सेनापती, सहकारी सरदार आणि अधिकारी यांची यादी खूप मोठी आहे आणि महाराजांच्या सैन्यात किमान 50 अत्यंत महत्वाचे मुस्लिम सेनापती होते. त्या प्रत्येकाच्या देखरेखीखाली मुस्लिम सैनिकांचा मोठा गट होता. महाराजांनी आपल्या राज्यात मुस्लिमांचे स्वागत केल्याचे बरेच पुरावे आहेत. 1657 च्या न्यायालयीन कामकाजात मुस्लीम काझींची (न्यायाधीशांची) एक यादी देखील उपलब्ध आहे. शिवरायांचे एकमेव चित्र रेखाटणारे मीर महंमद होते. शिवरायांसोबत आग्रा भेटीसाठी मदारी मेहतर ही गेले होते, शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा औरंगजेबने मदारी मेहतर यांना मृत्यु दंड दिला.

     वरील सर्व बाबींवरून एक गोष्ट लक्षात येते की, छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते, इतर धर्माचा सन्मान करीत होते, मात्र काही राजकीय तसेच मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी शिवाजी महाराजांना व त्यांच्या कार्याला आपल्या सोयीने स्वरूप दिलेले आहे व आपली राजकीय पोळी भाजत आहेत.

     सरतेशेवटी एवढेच म्हणावे लागेल, ना भूतो ना भविष्यते ऐसा राजा होणार नाही हे सत्य सूर्यप्रकाशा सारखे आहे. आणि म्हणूनच 19 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश शिवमय झालेला असतो.

३ टिप्पण्या: