मयत अनिल रामचंद्र बारड |
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामोड व बुरंबाळी दरम्यानच्या हॉटेल निसर्गमध्ये जेवल्यानंतर तंबाखु खाण्यासाठी चुना मागण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून झाला आहे. संशयित आरोपी विकास नाथाजी कुंभार रा. कुंभारवाडी याला पोलिसांनी अटक केली.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ,विकास नाथाजी कुंभार व जितेंद्र केरबा खामकर रा. खामकरवाडी या दोघांची हॉटेलमध्ये वादावादी झाली. हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने धामोड येथील त्यांचे मामा अनिल रामचंद्र बारड यांना बोलावुन घेतले व रात्री ११.०० वाजता ते दोघेजण कुंभारवाडी ता. राधानगरी येथे गेले असता आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकुने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. पाठीत व खांद्याच्या खाली वर्मी वार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. मारेकरी विकास कुंभार याला राधानगरी पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह कोळी करीत आहेत. मयत अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर पदी कार्यरत होते.
या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा