विज मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : शेतीसाठी दिवसा १० तास वीज द्या, या मागणीसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर स्थगित करीत आहोत. सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे १५ दिवसांच्या आत शेतीला दिवसा विजेचा निर्णय घ्यावा, अन्यथा सरकारविरोधात आरपारची लढाई करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
५ एप्रिल,२०२२ रोजी कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीची बैठक घेणार असून त्यात स्वाभिमानीच्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.
शेतीला दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानीच्या वतीने कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर मंगळवारपासून कोल्हापूर येथील ठिय्या आंदोलन स्थगित करत असल्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला.
शेट्टी म्हणाले, शेतीला दिवसा वीज देणे सरकारला शक्य आहे. आम्ही हक्काचे मागतो आहोत. विजेसाठी जमिनी आमच्या, धरणं आमच्याच जमिनीवर बांधली, पुनर्वसन देखील आमच्या शेतकर्यांच्याच जागेत. त्यात मदत देताना तुटपुंजी मदत दिली गेली. मग दिवसा वीज देताना शेतकर्यांना वाईट वागणूक कशासाठी देता? महापुरात मदत देताना सरकारने आमची शुद्ध फसवणूक केली आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वास उरलेला नाही.
यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, अण्णा चौगुले, राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यासह बहुसंख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा