Breaking

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

नोकरी आणि उद्योगांसाठी नाविण्यपूर्ण कौशल्य विकसित करण्याची आवश्यकता - कृष्णा गावडे*

 

कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर : - नोकरी मिळविण्यासाठी आणि उद्योग उभारण्यासाठी नाविण्यपूर्ण कौशल्य आवश्यक आहे.  त्याचबरोबर, गायन, वादन, लेखन, नृत्य, वक्तृत्व, चित्रकला, छायाचित्रण यांसारख्या मनोरंजनात्मक व आवडीच्या कौशल्यामुळे ताण-तणाव कमी होतो, असे प्रतिपादन किर्लोस्कर प्रा.लि.कंपनीचे माजी सह उपाध्यक्ष कृष्णा गावडे यांनी केले.

     शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, अतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित 'कौशल्य व उद्योजकता विकास कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी कृष्णा गावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील हे अध्यक्षस्थानी होते.  

    कृष्णा गावडे पुढे बोलताना म्हणाले, सध्या जगामध्ये खुप वेगाने तांत्रिक बदल होत आहेत.  त्यांची माहिती करून घेणे व बदलते तंत्रज्ञान आत्मसात करणे हे विद्यार्थी आणि उद्योजगाकांसाठी गरजेचे आहे.  आजच्या नोकरी, व्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये पुढील दहा वर्षांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येईल.  त्यासाठी भविष्यकाळ ओळखून आताच्या पिढीने आवश्यक कौशल्य गुण अंगीकारणे महत्वाचे आहे.  ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आनंद आणि समाधान मिळतो त्या क्षेत्राची निवड करावी.  नवउद्योजकांनी मूल्य शिक्षणाची जोड धरणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्या झपाटयाने बदलत चाललेल्या जगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये सातत्यपूर्ण बदल घडवत राहणे काळाची गरज आहे.  याकरिता वेगळयाप्रकारची विचारसरणी जोपासणेे आवश्यक आहे.  कौशल्य म्हणजे प्रतिकुलतेकडून अनुकुलतेकडे जाण्याचा प्रवास. कौशल्यता आणि उद्योजकता विकास म्हणजे शाश्वत विकास.  कौशल्यावर उद्योग अवलंबून असते, कौशल्यावर नोकरी मिळवू शकतो, बढती मिळवू शकतो.  कौशल्य असेल तर कामामध्ये आपले वेगळेपण दिसून येते.

       प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, जग ज्याप्रमाणे बदलत आहे त्याप्रमाणे आपले ज्ञान बदलणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी शिक्षण आणि अध्यापन पध्दतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी नाविण्यपूर्ण बदल, सर्जनशीलता, संवाद कौशल्ये वाढण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आंतरमनाचा आवाज ओळखून आपले क्षेत्र निश्चित करावे.  तहान भूक विसरून आपण जे काम करता ती आपली आवड समजावी. आज विद्यापीठाकडून विविध प्रकारचे 134 कौशल्य देण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.  नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यांचा आंतरभाव केलेला आहे.  विद्यार्थ्यांनी स्वत:ची परीक्षा स्वत: घेवून आयुष्याची दिशा ठरवावी. बदल्या तंत्रज्ञानाची दिशा आणि क्षमता ओळखून पुढे मार्गक्रमण करावे.  कौशल्याशिवाय भविष्यामध्ये संधी मिळणे अशक्य आहे. दृष्टी आणि दृष्टीकोन बदललात तर जग बदलेले.  घरातील आणि उद्योग धंद्यांमधील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी आणि उद्योजकांनी अतिसुक्ष्म विचार करणे गरजेचे आहे.  

    कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ.ए.एम.गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  महेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.  यावेळी डॉ.पी.डी.राऊत, डॉ.व्ही.एस.खंडागळे, डॉ.के.बी.पाटील यांचेसह संलग्नित महाविद्यालयातील कौशल्य प्रशिक्षक, विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा