Breaking

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

*कौतुकास्पद !अपघाती मृत्यू पावलेल्या युवराजच्या मुलाची शैक्षणिक जबाबदारी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने स्विकारली*


सौरभ शेट्टी यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


  तिरपण ता.पन्हाळा येथील युवराज बाबुराव पाटील या 40 वर्षीय शेतकऱ्याचे रविवार दि.10/04/2022 रोजी रोजी शेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत युवराज याच्या जनावरांच्या शेड वर पडून यात वैरण टाकण्यासाठी गेलेल्या युवराजचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला..आणि युवराजच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

              शेतमजूरी करणारा युवराज घराचा एकटाच कर्ता पुरुष..घरात वृद्ध अंध वडील, वयस्कर आई, मतिमंद अविवाहित बहीण, पत्नी आणि 13 वर्षाचा मुलगा रोज शेतमजूरी करायची आणि कुटुंब चालवण्याचे धाडस युवराज समर्थपणे पेलत होता.

          पण युवराजचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आई वडिलांचा श्रावण बाळ गेला, बहिणीचा पाठीराखा भाऊ गेला ,पत्नीचा कुंकवाचा धनी गेला आणि 13 वर्षाचा अथर्व बापासाठी पोरका झाला..युवराजच्या कुटुंबाची हालाकीची परिस्थिती पाहून समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे आले आणि युवराजच्या कुटुंबाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत....

        अशातच युवराजच्या दुर्दैवी मृत्यूची ही बातमी प्रसारमाध्यमांतून मा.खा.राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांना समजली आणि आज सौरभ शेट्टी यांनी युवराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व युवराजचा 7 वी मध्ये शिकणारा मुलगा अथर्व याची पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद स्विकारत असल्याचे सांगितले व शासकीय योजनेतून या निराधार कुटुंबास लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असा शब्द सौरभ शेट्टी यांनी दिला.     

          यावेळी स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष विक्रम पाटील, बाबासाहेब पाटील, शिवाजी पाटील, सुरेश पाटील, निवास कांबळे, शिवराज रेणूशे,शाहूवाडी तालुका युवा अध्यक्ष पद्मसिंह पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा