Breaking

शुक्रवार, २७ मे, २०२२

हेरवाड ग्रामपंचायत ने विधवा प्रथेबाबत घेतलेल्या निर्णयाचा जागतिक पातळीवरील " आम्ही लेखिका " या संस्थेने केला सत्कार

 


हेरवाड, शिरोळ : २१ मे

       समाजाचा अर्धा भाग म्हणजे स्त्री , तिच्या संबंधातील " विधवा प्रथा " बंद करणे हे क्रांतीकारी पाऊल उचलून स्त्रीचे अश्रू पुसले आहे , म्हणून हेरवाड हे गाव प्रत्येक स्त्री साठी आदरणीय ठरले आहे.

           - प्रा. सुनंदा पाटील, अध्यक्षा - आम्ही लेखिका

 

      हेरवाड ( ता.शिरोळ, जि. कोल्हापूर )या गावाने , भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात , आणि छत्रपती राजे शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे , ते म्हणजे ग्रामसभेमध्ये विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा घेतलेला निर्णय. आणि याच क्रांतिकारी निर्णयाचा सत्कार जागतिक पातळीवरच्या ' आम्ही लेखिका' या संस्थेने केला. यावेळी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ यांचा पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.

   

प्रा.सुनंदा पाटील सरपंच सुरगोंडा पाटील यांचा सत्कार करताना



        भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व लोकराजे शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षात घेतलेल्या या निर्णयापासून प्रेरणा घेऊन अनेक ग्रामसभा असा ठराव करीत आहेत . आणि ठराव होण्यास वेळ असेल तरी याची अंमलबजावणी त्वरित करीत आहेत , ही अभिनंदनीय बाब आहे . यासाठी सरपंच श्री सुरगोंडा पाटील , यांचे खास मुंबईहून आलेल्या जेष्ठ लेखिका प्रा सुनंदा पाटील यांनी सदस्य पुष्पा कोल्हे मुंबई , अंजली दिवेकर मिरज यांच्या सोबत शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ , सन्मानपत्र आणि ५० ग्रंथांची ग्रंथभेट देवून सन्मान केला . सूचक म्हणून मुक्त्ता पुजारी आणि अनुमोदक सुजाता गुरव यांचा, तसेच ग्रामविकास अधिकारी ' सर्व सदस्य आणि काही ग्रामस्थांचा सन्मान केला .



      तसेच महाराष्ट्र सरकारनेही त्याचा स्वीकार करून अभिनंदन केले आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची पुरोगामी परंपरा विकसित करणाऱ्या हेरवाडचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे मत सुनंदा पाटील यांनी व्यक्त केले. त्या हेरवाड ग्रामपंचायतीत विविध संस्था - संघटना यांच्या वतीने सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलत होत्या. 

       यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील , ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, उपसरपंच विकास माळी, ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई पुजारी, सुजाता पाटील , अर्चना अकिवाटे, सुनीता आलासे, सुषमा माने, सीमा बरगाले, अनिता कांबळे, .शांताबाई तेरवाडे, मंगल देबाजे, सुभाष शिरढोणे, कृष्णा पुजारी, देवगोंडा आलासे, सुकुमार पाटील, अमोल कांबळे, संभाजी मस्के या सर्वांचा ग्रंथ , गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


       यावेळी बोलतांना सरपंच सुरगोंडा पाटील यांनी या ठरावात व अंमलबजावणीत सहकारी सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याचा प्रवास उलगडून दाखविला. तसेच माध्यमांनी या घटनेची घेतलेली नोंद याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज ( हैद्राबाद ) संस्थेचे निखिल भुयार , विशाल बेदरे , यांच्यासह विविध जिल्ह्यातील संस्था - संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक महिला संघटनांची येथे असलेली उपस्थिती म्हणजे त्यांनी या ठरावाचे उत्स्फूर्तपणे केलेले स्वागत होते असे समजायला हरकत नाही.


      "आम्ही लेखिका " या जागतिक साहित्य संस्थेने या बातमीची घेतलेली दखल म्हणजे , "साहित्य हा समाजाचा आरसा आहे " हे पुन्हा अधोरेखीत झाले. "आम्ही लेखिका " सदैव स्त्री संबंधी प्रश्नांसाठी गणमान्य संस्था आहे . या संस्थेने अनेक हात लिहिते केलेले आहेत अनेक महिलांना मंच मिळवून दिलेला आहे.

      या सभेनंतरही अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रत्येक स्त्री ही निर्भिड आणि स्वतंत्र श्वास घेणारी आहे , सबला आहे , हे जाणवत होते.

      या कार्यक्रमात अनेक ग्रामस्थ , मान्यवर मंडळी , उपस्थित होती.

1 टिप्पणी: