![]() |
विधवा प्रथा बंद करण्याचे ठरावाची प्रत देताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव करण्यात आला. पुन्हा एकदा शिरोळ तालुक्यातील पुरोगामी विचारांचा वारसा व कृतिशील कार्य करण्याचं निर्णय व ठराव ग्रामपंचायत नांदणी कडून ही घेण्यात आला आहे.
झालेल्या अधिकृत बैठकीनुसार ग्रामपंचायत नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे विधवा प्रथा बंद करणे बाबत चर्चा करणेत आली. या प्रथेमूळे पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगडया फोडणे, तसेच गळ्यातील मंगळसुत्र तोडणे असे अमंगल कृत्य विधवा महिलेच्या बाबतीत केले जाते. अशा विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात अपशकुन मानून डावलले जाते. तसेच महिलेला जो सुवासिनी म्हणून मान असतो तो पतीच्या निधनानंतर कायमचा हिरावून घेतला जातो. या प्रथेमुळे महिलेच्या नैसर्गिक हक्कावर व अधिकारावर गदा येते. तसेच मानवी कायद्याचा भंग होतो. तरी आपल्या गावामध्ये व देशामध्ये पतीच्या मयतानंतर तिच्या वयाचा विचार करिता तिचा पुर्नविवाह करण्यात यावा त्या संदर्भात संपूर्ण गांवात, तालुक्यात व पूर्ण जिल्हयात याबाबत जनजागृती करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.. यासाठी नांदणी च्या सरपंच सौ.संगीता तगारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी यासाठी मोलाची कामगिरी केली.
नांदणी ग्रामपंचायतीच्या या ठरावाने विधवा महिलांना सन्मान मिळणार आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड,गणेशवाडी, धरणगुत्ती नंतर नांदणी हे गाव असा ठराव करणारे चौथे गाव ठरले आहे.
नांदणी ग्रामपंचायतीमुळे आता शिरोळ बरोबर कोल्हापूर जिल्हाला पुरोगामी जिल्ह्याचा दर्जा मिळणार आहे हे मात्र निश्चित आहे. शिरोळ तालुक्याची वाटचाल विधवा महिलांचा सन्मान करणारा व पुरोगामी तालुका म्हणून नावलौकिक होत आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना जय हिंद न्यूज नेटवर्क च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपणही विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी आपण सर्व घटक एकत्रित येऊन अशा प्रकारचा ठराव करून आपल्या गावाला किंबहुना समस्त महिलांना सन्मान मिळवून द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा