Breaking

मंगळवार, ३ मे, २०२२

स्त्री चळवळीचे प्रणेते : महात्मा बसवण्णा. प्रा.आस्मा बेग यांच्या विशेष लेखणीतून


प्रा.आस्मा बेग- सौंदलगे  यांच्या लेखणीतून साकारलेला विशेष लेख

     देवचंद कॉलेज ,अर्जुन नगर निपाणी


      सत्य, करुणा, मानवतेचा संदेश सर्वप्रथम तथागत बुद्धांनी जगाला दिला. त्याच विचारांची कास धरून महात्मा बसवण्णा यांनी अकराव्या शतकात मानवतेच्या विस्मृतीला उजाळा दिला . महापुरुषाला ईश्वरी मान्यता देऊन त्यांच्या कार्याचा अभ्यास करणे याला अलौकिकवादी विचारपद्धती म्हणतात, तर महापुरुषांच्या जीवनाचा आणि कार्याचा सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याला लौकिकवादी विचारपद्धती म्हणतात. बसवा यांच्या विचारांचा अलौकिक पद्धतीने विचार झाला असल्यामुळे त्यांचे जे युगदृष्टेपण होते ते अवताराच्या गर्दीत पुसट झाले . पण जेव्हा त्यांचा लोकलौकिकवादी दृष्टिकोनातून विचार केला जातो तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व तेजोमय वाटायला लागते त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघते.

      आपला भारत महान परंपरा आणि समृद्ध संस्कृतीने नटलेला देश आहे. या देशात अनेक जाती, धर्म, प्रथा, परंपरा, भाषा आहेत. लोकशाही ही आजची सर्वात लोकप्रिय विचारधारा आहे. लोकशाही ही समाजाच्या सर्वांगीण परिवर्तनाची कल्पना आहे. 15 ऑगस्ट रोजी भारताने स्वातंत्र्याच्या दारात प्रवेश केला. भारतीय लोकशाहीचा उदय अलीकडचा असला तरी त्याचा इतिहास खूप जुना आहे. महात्मा गौतम बुद्ध, संत नामदेव, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींचे विचार लोकशाहीला पूरक ठरले आहेत. 12व्या शतकात भारतीय समाजात लोकशाही स्वातंत्र्याची मूल्ये रुजवण्यात बसवजींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

           अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि असमानता यांवर मात करून बुद्धाच्या विचारांचा अंगीकार करणारे बसव हे पहिले क्रांतिकारक होते. सामाजिक, धार्मिक समतेच्या पुरस्कारासाठी त्यांनी शिवलिंगाचे प्रतीक उपयोगात आणले आणि दलित- पीडितांना लिंगायत धर्म दिला. बसवांनी सर्व जातींना एकतेच्या सूत्रात बांधले . अनेक दलित, अस्पृश्य बांधवानी बसव विचारांनी प्रेरित होऊन केलेले कार्य हे बसव विचार वृक्षाचे गोड फळ आहे. बाराव्या शतकात बसवांनी महिलांना अनुभवमंडप व्यासपीठावर आणून त्यांच्या पायाच्या बेड्या तोडल्या आणि सर्व जातीतील महिलांना मानवतेच्या आधारावर पुरुषांच्या जोडीला आणून बसवले.

      

 महात्मा बसवण्णांचा जन्म

       मादिराज-मादलांबिका पती-पत्नीस ज्येष्ठ पुत्र 'देवराज' व ज्येष्ठ कन्या 'नागलांबिका' होती.बागेवाडीच्या जीवनात असाच एक शुभ दिवस उगवला इ.स. 1105 मधील रोहिणी नक्षत्रावर अक्षयतृतीयेच्या दिवशी मादलांबिकेला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झाले. बागेवाडीत आनंद झाला. मुलाचे नाव 'बसव' ठेवण्यात आले. हाच बसव पुढे समतायुगाचा दृष्टा 'महात्मा बसवण्णा' म्हणून जगापुढे आला.. अंधश्रद्धा आणि रूढी पाळणाऱ्या कुटुंबात महात्मा बसवन यांचा जन्म झाला. बसवण्णा अतिशय हुशार होते. घरात नेहमी देवाची पूजा चालू असायची, पण बसवांनी त्याचा तिरस्कार केला.


स्त्री स्वातंत्र्याचे प्रणेते महात्मा बसवण्णा:

       जगाच्या संपूर्ण इतिहासात, अगणित लोक अन्याय आणि अत्याचाराच्या टाचेखाली चिरडले गेले आहेत. त्यांना मिळालेले दुःख हे निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित होते. अशा पुरुषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्वाखाली स्त्रियांचा इतिहास पाहिला, तर गुलामगिरीच्या वेदनांनी रडणाऱ्या स्त्रियांचा इतिहास आहे. कारण पुरुषप्रधान समाजाने महिलांवर अन्याय करण्यातच पुरुषार्थ मानला आहे. महिला फक्त बळी ठरल्या. शास्त्राच्या काटेरी कुंपणात त्यांचे जीवन बंदिस्त झाले. त्यांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता. अशी परिस्थिती बाराव्या शतकात बसवपूर्व काळात होती. 12 व्या शतकात अभूतपूर्व क्रांती झाली. ही क्रांती केवळ कर्नाटकच्या इतिहासातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासात महत्वपूर्ण झाली. आणि या क्रांतीचे मूळ कारण महात्मा बसवण्णा होते.

       बसव यानी स्त्रियांच्या साठी आंदोलन केले . बसवण्णा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तीस महिला होत्या. या जगाच्या इतिहासात यापूर्वी कधीही कोणत्याही चळवळीत महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला नव्हता. ही एक अद्भुत गोष्ट होती.बसवण्णांच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोघेही समान होते. स्त्री काय करू शकते हे अक्कमहादेवी सारख्या महान व्यक्तिमत्वाने दाखवून दिले. कारण बसवण्णांनी स्त्रियांना पूर्ण समानता आणि स्वातंत्र्य दिले होते. अक्क महादेवी इतकी खंबीर होती की तिने राजवैभवाला लाथ मारली आणि कल्याणचा मार्ग धरला. स्त्री ही माया आहे असे म्हणून स्मृतीकारांनी स्त्री वर्गास हिनवले तर वीर वीरांगिनी अक्का महादेवी स्त्री जर पुरुषास माया आहे तर पुरुष ही स्त्रीला मायाच आहे असे ठणकावून सांगितले. 

         बसवन यांनी अनुभव मंडपात महिलांना समान अधिकार दिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. बसवनाच्या क्रांतीसमोर स्त्रियांचा बाह्य बदल उदयास आला. स्त्रियांचे अंतर्बाह्य परिवर्तन बसवांना यांच्या क्रांतीमुळे घडले याची अनेक उदाहरणे आहेत. लक्कम्मा शरणीच्या चारित्र्यावरून पाहायला मिळते . एके दिवशी तांदूळ वेचण्याचे काम करणारा आपला पती नेहमीपेक्षा जास्त तांदूळ घेऊन आला तेव्हा लक्कम्मा नाराज होऊन तिच्या नवऱ्यावर रागावून आपल्या पतीला निर्भिडपणे जाब विचारते की, विसरून आला तुम्ही बसव संदेश? हेच का तुमचे मन?बसवण्णांच्या चित्ती संदेह का ? केवढे मोठे धैर्य लक्कमाचे. हा बसवांनाच्या विचारांचा परिपाक आहे. 

    महिला कर्मकांड ,व्रत ,उपवास यामध्येच अडकल्या होत्या. बसवण्णांनी महिलांची या सगळ्यातून सुटका केली. बसवण्णा यांनी स्त्री साक्षरता, बालविवाह, पुनर्विवाह यांना प्रोत्साहन दिले व सतीप्रथा ,केशमुंडन यांना विरोध केला . स्त्रीच्या जीवनातील मानसिक व्यंग आणि अध:पतन दूर करून बसवण्णांनी नवचैतन्य, उल्हासची ज्योत जागवली. बसवण्णा यांनी श्रमप्रतिष्ठा जागवली. "काय कवे कैलास म्हणजे श्रम हीच उपासना",हा संदेश बसवण्णा यांनी दिला. बसवण्णा पूर्णत: बुद्धिप्रामाण्यवादी होते. ते रूढीवादी विचारसरणीच्या विरोधात लढत होते. बसवांचा विचार पूर्णपणे वैदिक परंपरेच्या विरोधात होता. कारण बसवांचा विचार समतावादी आहे. त्याला एक विलक्षण मिश्रण मिळाले आहे . श्रमण परंपरा, भिक्खू परंपरा आणि चार्वाकाची जडवादी परंपरा यांचे बसव विचार हे अन्यायाविरुद्धचे धारदार शस्त्र आहे.बसव विचार हे बहुजनांचे सन्मानाने जगण्याचे तत्वज्ञान आहे.गुलामीच्या बेड्या तोडणारा हा मुक्तीमार्ग आहे.शोषण दूर करणारी मशाल आहे . बसवांच्या विचाराने आपले कल्याण होणार आहे .बंडखोर विचारसरणीला बसवेश्वरांचा सार्थ अभिमान आहे.


      ✍🏼 आस्मा बेग- सौंदलगे 

     देवचंद कॉलेजअर्जुन नगर निपाणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा