![]() |
राजर्षी शाहू महाराज |
आज ६ मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०० वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने हे वर्ष 'कृतज्ञता पर्व' म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणाार आहे. या निमित्ताने रथोत्सव, पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन, असे व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. शाहू महाराजांनी कृषी, उद्योग,कला,क्रीडा,आर्थिक धोरण, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केली आहेत. त्यांनी योजीलेले आर्थिक धोरण आजच्या राज्यकर्त्यांनी वापरले तर देशाची आर्थिक स्थिती काही औरच असेल पण दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तर आज राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या आदर्श आर्थिक धोरणाची माहिती व कार्य पाहू.
कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे .शाहू महाराजांचा जीवनकाळ 1874 ते1922 म्हणजे उणेपुरे 48 वर्षाचे आयुष्य व त्यात इंग्रज आमदानीचा काळ .हा काळ अत्यंत मागास होता. हा काळ कसा असेल ह्यासाठी आपले पणजोबा खापरपंजोबा आठवूया, म्हणजे हा काळ किती मागास होता याची कल्पना येईल. या काळात एखादा मनुष्य काय कार्य करू शकतो व अश्या काळात एखाद्या मनुष्याचे विचार कितपत पुरोगामी असू शकतात हे बघायचे असेल तर शाहू महाराजांच्या कार्या कडे पहावे लागेल. अशा अंधार काळात एखादा मनुष्य किती पुढचे पाहू शकतो या गोष्टी आपल्याला कळाल्या तर आपण त्यांना द्रष्टे म्हणू . या लेखात फक्त शाहू महाराजांचे आर्थिक धोरण या मुद्द्यावर आपण त्यांचे पुरोगामीत्व तपासणार आहोत.
शाहू महाराज :आर्थिक धोरण
शाहू महाराजांचे आर्थिक विचार म्हणावे तितके समाजामध्ये अजूनही पोहोचलेले नाहीत. हे वास्तव आहे. तो काळ होता 1915 चा,ज्या काळामध्ये भारतातील संस्थांनिक आपल्या प्रजेची काळजी करत नव्हते. ऐश आरामात मशगुल होते त्या काळात शाहू महाराजांनी प्रजेच्या हिताचे काम केले.( अपवाद बडोदा संस्थान)
भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती .भारतीय प्रजेचे शोषण करणे हे त्यांचे काम होते. देशाचे संरक्षण कायदा आणि सुव्यवस्था एवढीच राज्यकर्त्यांची कामे आहेत .आर्थिक क्षेत्रात शासनाने ढवळाढवळ करू नये ही त्यांची भूमिका होती . प्रजेला सुखी करणे त्यांच्या प्रगतीला मदत करणे आणि आर्थिक विषमता दूर करणे ही राज्यकर्त्यांची कामे नाहीत हा विचार प्रबळ होता . मुक्त अर्थव्यवस्था, खुली स्पर्धा ही धोरणांची सूत्रे होती .जो समर्थ असेल तो टिकेल.जो दुबळा असेल तो मरेल, नव्हे मरावाच लागेल, असे अर्थशास्त्र रूढ होते. त्या काळातील शाहू महाराजांचे आर्थिक धोरण विचारात घेतले म्हणजे त्यातील द्रष्टेपण निदर्शनास येईल . या काळात शाहू महाराजांचे आर्थिक धोरण काय होते हे पहावे लागेल
शेती
महाराजांच्या काळात शेती हा मुख्य व्यवसाय होता. 1893 -94 साली प्रत्यक्ष शेतीखालील जमीन 12,94196 एकर होती, ती 1921-22 साली 14,26,535 एकर इतकी वाढली . म्हणजे प्रत्यक्ष शेता खाली जमिनीत कशीबशी दहा टक्याहून थोडी जास्त वाढ झाली होती. शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीचा आकार मोठा असावा असे महाराजांचे मत होते.“ वाटणी व्यवहाराने शेतीचे लहान लहान तुकडे होतात, ते किफायतशीर राहत नाहीत आणि शेतकरी त्या तोट्याच्या शेतीच्या व्यवसायात अडकून पडतो आणि प्रगतीला मुकतो”असे महाराजांचे म्हणणे होतें . शेती सुधारण्यासाठी नव्या अवजारांची गरज आहे हे शाहू महाराजांनी ओळखले होते . शेतकी सुधारणेस सुधारलेल्या औतांची फार जरुरी आहे हे ओळखून महाराजानी आदर्श शेतीचे प्रयोग करून दाखवले .1922 साली कोल्हापुरात स्वतंत्र शेती संस्था स्थापन करण्यात आली. सुधारित अवजारांचे एक म्युझियम उघडण्यात आले होते . त्यातील अवजारे प्रयोगांच्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येत . इतकेच नव्हे तर महाराजांच्या कारकीर्दीत शेतीमधील प्रयोग करून दाखवणाऱ्या एका पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. शेती ची व जनावरांचे प्रदर्शन भरवले जात असे. त्यातून त्यांचा श्रमप्रतिष्ठा हा पुरोगामी विचार दृष्टीस पडतो. स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेणारे संस्थानातील काही मंडळी शेती करणे हे कमीपणाचे मानीत त्यांच्याकरिता महाराज म्हणतात, “ कृषी कर्मापासून दुहेरी उन्नती होते . स्वतः सुखी होऊन , सर्व मनुष्यजातीला सुख मिळते. कृषिधर्म करताना क्षात्रधर्माला बाधा , असे नाही. ज्यावर मनुष्य समाजाची सुव्यवस्था व उन्नती अवलंबून आहे, ते कर्म करणारे क्षुद्र आहेत, हे म्हणणे मला मुळीच पटत नाही. ”यातून त्यांचा पुरोगामी विचार दृष्टीस पडतो .
पीक पद्धती – नवी पिके
संस्थानाच्या हद्दीत वेगवेगळी पिके लावण्याचा उपक्रम शाहूमहाराजांनी करून पाहिला. पन्हाळा व भूदरगड येथे चहाची व कॉफीची लागवड करून पाहिली. याच भागात वेलदोडे, कोको, रबर, ताग, अंबाडी, बटाटे, लाख, काम ट्रपिओका , कंबोडियन कापूस ही पिके लावण्याचा उपक्रम करून पाहिला. रोपे करून महाराजांनी बागा करविल्या. खतांचे प्रयोग केले. हिरडा , जांभूळ, साग, ताग, काजू, आंबा , फणस इत्यादी बागा लावायला प्रोत्साहन व प्रत्यक्ष सहाय्य केले . कोल्हापूरचा शेतकरी आज उपक्रमशील आहे. शेतीच्या जोडधंदयाचा ही शाहू महाराजांनी विचार केला होता . त्यांच्या भाषणात असे स्पष्ट उल्लेख आढळतात. शेतकीच्या जनावरांची पैदास , चांगल्या जातीची पैदास, कोंबडी व बदकांची पैदास, दुधदुभत्याची उत्पती याही बाबी त्यांच्या आर्थिक विचारांचा भाग बनल्या होत्या .
पाणीपुरवठा
त्या काळी संस्थानात दुष्काळ पडत असे. दुष्काळ निर्मूलनाचा खरा मार्ग शेतीला पाणी पुरवठा वाढवणे हाच होय. याची त्यांना जाणीव होती. नद्या, विहिरी आणि तलाव या सर्व मार्गांचा अवलंब संस्थानात होत होता .सन 1915-16 च्या अहवालावरून असे दिसते की, नद्यापासून 39,773 एकर , विहिरीपासून 29,845 एकर आणि तलावापासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणीपुरवठा होत होता. तळी, विहिरी, बंधारे बांधण्यास शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले.
राधानगरी धरण
आर्थिक कुवत कमी असताना व मर्यादित तंत्रज्ञान असताना राधानगरी धरण बांधणे म्हणजे महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हटला पाहिजे . असे नियोजन चालू होते.1909 पासून धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली .धरण बांधताना अनेक अडचणी आल्या, पैसा कमी पडू लागला. मधून-मधून काम थंडावले सुद्धा , परंतु चिकाटीने महाराजांनी हे काम सुरूच ठेवले. शाहू महाराजांच्या हयातीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. पण बरेच काम पूर्ण झाले , पुढे राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत हा प्रकल्प पूर्ण झाला. पुढे पायथ्याशी विद्युत निर्मिती केंद्रही स्थापन झाले. आज कोल्हापुरात दिसत असलेल्या हरितक्रांतीचे खरे प्रणेते शाहू महाराजच आहेत. त्यांनी ठेवलेल्या वारशावरच कोल्हापूरची शेती आज स्थिरावली आहे.
सहकार
सहकार चळवळीमध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. याची सुद्धा सुरुवात शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झाली आहे. 1912 साली त्यांनी सहकार विषयक कायदा केला. आज नावारूपाला आलेली ‘ अर्बन को- ऑप बँक ' आणि ‘ बलभीम - को- ॲप बँक ’ त्यांच्याच कारकिर्दीत निघाल्या.1920 - 21 सालीच कोल्हापूर संस्थानातील सहकारी सोसायटीची संख्या 37 होती . शाहू महाराज आपल्या एका भाषणात म्हणतात “ पुष्कळ लोकांनी आपली कुशलता , अक्कल, पैसा व अंगमेहनत एकत्र केली पाहिजे. म्हणजे सहकार्य केले पाहिजे . पूर्वी फार तर एक कुटुंब एका ठिकाणी काम करी व येणारा नफा त्या कुटुंबातील माणसांना उपयोग पडे . आता ही आपली कुटुंबाची व्याख्या पुष्कळ विस्तृत केली पाहिजे ,या उद्योगधंद्यासाठी 20-25 कुटुंबे एक झाली पाहिजेत. आपण सहकार्य करायला शिका . आपली सहकारी पतपेढी काढा. इतकेच नव्हे, तर सहकारी कारखाने, सहकारी दुकानेही काढा.” कोल्हापूर जिल्ह्यातील आजच्या आर्थिक विकासाला जवळ-जवळ प्रत्येक गोष्ट शाहूमहाराजांच्या कार्याशी निगडित आहे.
संस्थानातील उद्योगधंदे :
उद्योगधंदे काढणे व चालवणे हे राजाचे काम नाही अशा विचारांचा प्रभाव असलेला तो काळ होता त्या काळात शाहू महाराजांनी कारखानदारीचा पाया रचला शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली . शाहूंनी सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीचा मुहूर्तमेढ रोवला. एका भाषणात म्हणतात “ आर्थिक संपन्नता औद्योगीकरणावर अवलंबून आहे . लोकांनी एकत्र येऊन सहकारी कारखाने, सहकारी संस्था व सहकारी बाजारपेठांची व्यवस्था राबवली पाहिजे .” एका भाषणात शाहू महाराज म्हणतात , “कारखानदारीच्या क्षेत्रातील मक्तेदारी, भांडवलशाही आणि तिच्यावर श्रमिक आणि इतर एजंट यांनी पूर्णपणे अवलंबून असणे रास्त नव्हे. अशा प्रकारची व्यवस्था भारतात मुळीच योग्य नाही. उद्योगांचे केंद्रीकरण झाल्यास खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोंढ्यामुळे शहरात गर्दी होऊन आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम उद्भवतात, हे टाळण्यासाठी विकेंद्रीकरणाची गरज आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारताला मार्गदर्शक असणारी ही आर्थिक धोरणाची सूत्रे 1920 च्या आगेमागे शाहू महाराजांनी सांगितली होती हे या आर्थिक विचारांची वैशिष्ट आहे
शाहू महाराजांचे धोरण आणि आर्थिक स्थिती :
आता एकविसाव्या शतकात भारतातील आर्थिक धोरणात एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो . शासनाने आथिर्क व्यवहार , उद्योग धंदे यात ढवळाढवळ करू नये. इतकेच नव्हे, तर शेती असो,शेतकरी असो व्यापार असो की कारखानदारी किंवा उद्योगधंदे . ज्याचे त्याने पहावे असे मत मांडले जाते . सब्सिडी बंद करावी . शेतकर्यांना सवलत देऊ नका . छोट्या आणि देशी उद्योगधंद्यांना सोयी , सवलती व संरक्षण देऊ नका. अशा मागण्या देशी व विदेशी विद्वान करीत असतात. सबळा ने जगावे. दुर्बलास जगण्याचा अधिकार नाही. असे तत्वज्ञान मांडले जाते. शाहूचा काळ आणि आजचा काळ बदलला आहे . तंत्रज्ञानात अमाप प्रगती झाली आहे. परंतु अजूनही शेतीतील दुर्बल घटक आहेत . मागासलेले प्रदेश आहेत. उद्योगधंद्यात मागासलेपण आहे . बेकारीचा प्रचंड प्रश्न आहे . दुबळ्या शेतीने कारखानदारी समोर टिकावं धरायचा असेल आणि ग्रामीण भागात जगणाऱ्या 60 -70 टक्के जनतेला दिलासा द्यायचा असेल तर शासनाला आपली भूमिका बजावावी लागेल. समाजात विषमता आहे .समता आपोआप स्थापन होणार नाही तर ती जाणिवपूर्वक स्थापावी लागेल . आणि त्यात शासनाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल .आज शाहू महाराजांची आर्थिक धोरण नसली तरी त्या आर्थिक धोरणांमागील दिशा आणि मुख्य सूत्र आजही अनुकरणीय आहे . शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते ,बोलके सुधारक नव्हते. ‘ शाहू महाराज की जय ‘ म्हणताना शाहू महाराजांचे आर्थिक धोरणही समजून घ्यावे .
✍🏼 आस्मा बेग - सौंदलगे
(लेखिका देवचंद कॉलेज अर्जुन नगर ,निपाणी, येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा