![]() |
कर्नाटकातील चित्रदुर्गा जवळ अपघात |
*प्रा. इम्रान मणेर : विशेष प्रतिनिधी*
लेंगरे : बहिणीच्या लग्नासाठी मदुराईहुन लेंगरे गावाकडे येत असताना कर्नाटक मध्ये झालेल्या चार चाकीच्या अपघातात लेंगरे गावचा सुपुत्र अक्षय शिंदे हा जागीच ठार झाला.ही घटना कर्नाटक मधील चित्रदुर्ग जवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर घडली. एक उमदा व मनमिळावू युवकाचा मृत्यू झाल्याने लेंगरे खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील उत्तम शिंदे यांचा मदुराई येथे गलाई व सराफ व्यवसाय आहे. अक्षय हा त्यांचा मुलगा त्यांच्या व्यवसायांमध्ये मदत करत होतो ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण व्यवसाय त्याने सांभाळला होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे व्यवसायामध्ये खूप प्रगती झाली होती तसेच गावी देखील मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता. पुढच्या आठवड्यामध्ये उत्तम शिंदे यांच्या मुलींचा विवाह समारंभ संपन्न होणार होता म्हणून अक्षय हा बहिणीच्या लग्नासाठी मधुराई इथून ३ मे रोजी सायंकाळी ४ वाजता वाहन क्र. टीएन-५९-बीएच-५८१० या गाडीने निघाला, त्याच गाडीमध्ये उत्तम शिंदे देखील होते. पुणे बेंगलोर महामार्गावर कर्नाटक जवळील चित्रदुर्ग जवळ गाडी पुढे घेत असताना अक्षयची गाडी ट्रकला (क्र. टीएन-५२-एल-०८४९) जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की चार चाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीतील सर्व व्यक्तींना चित्रदुर्ग येथील दवाखान्यामध्ये हलविण्यात आले. प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये नेत असताना अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान ही बातमी लेंगरे गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. गावातील अनेक गलाई व्यावसायिकांनी स्थानिक व्यवसायिकांची संपर्क साधून तातडीने मदत पुरवली, तसेच गावातील व्यवसायिक चित्रदुर्ग येथे तातडीने पोहोचले. बुधवारी सायंकाळी ६ वाजता अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह लेंगरे येथे आणण्यात आला. पंचक्रोशीतील आबालवृद्धांसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा