Breaking

रविवार, १५ मे, २०२२

*जयसिंगपूराचे माजी नगराध्यक्ष प्रा.असलम फरास यांचे कार्य प्रेरणादायी व समाजाबद्दलची निष्ठा व बांधिलकीचे दर्शन*

 

माजी नगराध्यक्ष प्रा.असलम फरास

*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर शहर हे औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या विकसित आहे. मात्र वाढती लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार पाहता विकासाच्या संदर्भात सर्व प्रकारच्या सेवा देण्यास नगरपरिषदेला मर्यादा पडत आहेत. मात्र शहरातील संवेदनशील जनता आपल्या पातळीवर कार्य करीत असते.

      अशा संवेदनशील जनतेबरोबर संवेदनशील काही नगरसेवक देखील जयसिंगपूर शहरात असल्याचे दिसून येत आहे. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष प्रा.असलम फरास हे त्यापैकीच एक सेवाभावी व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत.जी.ए.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगली येथे सन १९८९ पासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक म्हणून सेवा बजावत असताना विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत दुसऱ्या बाजूला जयसिंगपूर शहरात नगर सेवक या पदाच्या माध्यमातून ते सातत्याने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत आहेत. प्रा. फरास हे  विविध कार्याच्या माध्यमातून जनतेसमोर येत असतात. स्वतः जातीने लक्ष घालून जयसिंगपूरातील विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात.पण एक गोष्ट मात्र विशेष या ठिकाणी सांगावी लागेल ती म्हणजे स्वतः नगरसेवक होण्यापूर्वी स्वतः हातात झाडू व खोरे घेऊन वार्डातील गटारी स्वच्छ करीत सामान्य लोकांचे जीवनाशी संबंधित प्रश्न सोडवीत असत. मात्र त्याचा एकही फोटो न काढता किंवा जाहिरात न करता ते सातत्याने काम करीत आहेत. नगरसेवक किंबहुना ते नगराध्यक्ष पदावर विराजमान असतानाही या कानाची त्या कानाला खबर न देता ते स्वतः सुट्टीदिवशी व कर्मचारी नसलेल्या ठिकाणी स्वतः गटारी साफ करून लोकांचे प्रबोधन करीत असत.

      *जयसिंगपूराचे माजी नगराध्यक्ष प्रा.असलम फरास यांचे कार्य 

       सन २००१ पासून ते आजतागायत नगरसेवक पदापासून ते नगराध्यक्ष पदावर (२००९ ते २०११ )विराजमान होऊन जनतेच्या कल्याणासाठी सदैव कार्य केले. सलग चार वेळा (२००१,२००६,२००९ व २०१४) नगरसेवक पद भूषवून अखंडितपणे जनतेची सेवा करण्याचा कार्य अविरतपणे सुरू आहे. मुळात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर परिवारावर निष्ठा ठेवून त्यांच्या विश्वासाला साथ देत त्यांचे कार्य चालू आहे. आपल्या राजकीय वरिष्ठ नेत्यांशी प्रामाणिक राहून ते कार्य करीत असतात.त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याची दखल घेत जनता त्यांच्या पाठीशी असते.  वार्डातील किंबहुना शहरातील जनतेचे प्रश्‍न सोडविणे त्याचबरोबर त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा त्यांचा स्थायी भाव बनलेला आहे. मुळात छ. शिवाजी महाराज यांना आराध्यदैवत मानून शाहू,फुले व आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक बनण्याचा प्रयत्न ते करीत असतात.जसे त्यांचे विचार पुरोगामी आहेत त्याच पद्धतीने त्याची कृती ही पुरोगामी व समाज भिमुख आहे.प्रा. फरास यांचे गुरु साक्षात त्यांचे वडील सुप्रसिद्ध व  संवेदनशील प्राथमिक शिक्षक कालवश सिकंदर फरास हे होते. वडिलांनी दिलेली संस्काररुपी उत्तम विचार व आचाराची शिदोरी घेऊन  कृतीशील विचारांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. ते पदापेक्षा कार्याला महत्व देतात त्यांचा संबंध हा पुरोगामी चळवळीतील प्रत्येक घटकाशी असून ते सातत्याने हिरीरीने सहभागी होत असतात. त्यांना अनेक सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार प्राप्त झाले आहे. सध्या सांगलीचे यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी ते सेक्रेटरी पद व राजषी शाहू विकास आघाडीचे सचिव म्हणून कार्य करीत आहेत.

      नगरसेवक पद हे सेवाभावी वृत्तीने करायचे पद असून याची शिकवण त्यांच्या कृतीतून प्रत्ययास येते.प्रत्येक नागरिकाला व राजकारणात पदार्पण करणाऱ्या नवीन कार्यकर्त्याला त्यांचे विचार व कृती प्रेरणादायी व आदर्शवत आहे हे मात्र निश्चित आहे.

1 टिप्पणी: