Breaking

शनिवार, १४ मे, २०२२

*स्वराज्य रक्षक संभाजीराजे ; उच्चकोटीचे शौर्यवान राजे*


स्वराज्य रक्षक शंभूराजे


     प्रा. इम्रान मणेर, जयसिंगपूर ( इतिहास अभ्यासक व लेखक) 


       वाचक मित्रहो, आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असलेने त्यांच्याविषयी आज काही माहिती आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज हे जागतिक किर्तीचे राजे होते. अशा या राजा विषयी आज पर्यंत काही लोकांनी जाणीवपूर्वक चुकीचे लिखाण केल्याचेही दिसतं, त्या सर्वांना शह देण्याचा हा एक प्रयत्न. छ.संभाजी महाराज मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र, स्वराज्याचे पहिले युवराज, मराठा साम्राज्यचे दुसरे छत्रपती होते. 

इतिहास-

संभाजीराजे भोसले (१४ मे, १६५७ – ११ मार्च, १६८९) हेे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती.  मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे जेष्ठ पुत्र होते.शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ते जेष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे राज्य केले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिध्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकांविरुद्ध लढा देत उभे होते.


बालपण-

संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर सईबाई यांच्या पोटी झाला. संभाजी राजे अवघे २ वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला. आईविना पोर सांभाळायची जबाबदारी त्यांच्या आजी शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊ यांनी स्वीकारली.

लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते. अनेक भाषा त्यांनी लहानपणीच अवगत होत्या. खेळात सुद्धा ते पटाईत होते. वयाच्या ८ व्या वर्षी संभाजीराजांना एका तहाखाली अंबरच्या राजा जयसिंग यांच्याबरोबर राहण्यास पाठवले गेले. यामागे शिवाजी महाराज यांचे चातुर्य होते. संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणी समजावी असा हेतू शिवाजी महाराज यांचा होता.

वयाच्या १४ व्या वर्षी संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचे सुंदर आणि अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे.

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-“कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा र्‍हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ ”

अगदी लहान वयात संभाजी महाराज यांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते.


विवाह-

संभाजी महाराज यांचा विवाह जिवाबाई यांच्याशी झाला. मराठा रीतिरिवाज नुसार त्यांनी आपले नाव येसूबाई ठेवले. शिवाजी महाराज यांनी कोकण मध्ये मराठा साम्राज्य वाढीसाठी प्रचितगड वर ताबा मिळवला. त्यात पिलाजीराव शिर्के यांची मदत झाली आणि मराठा साम्राज्य ला कोकण ची वाट मोकळी झाली. त्यात झालेल्या तहानुसार संभाजी राजे यांचा विवाह पिलाजीराव यांच्या कन्या येसूबाई(जिवाबाई) यांच्याशी झाला.


राज्याभिषेक-

शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली.१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला.

शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली.१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला.


पराक्रम-

संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला.संभाजी महाराज यांनी गनिमी कावा च्या पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यात महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी १२० पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेब ला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो चवताळून उठला होता.


संभाजी महाराज व दिलेर खान-

. शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिण दिग्विजय करण्यासाठी कर्नाटक स्वारीवर जाताना (नोव्हेंबर १६७६) संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली होती. काही इतिहासकारांच्या मते कदाचित सावत्र आई सोयराबाईंच्या सहवासात त्यांना रायगडावर ठेवणे महाराजांना इष्ट वाटले नसावे. तर काहींच्या मते दिलेर खान ला खेळवत ठेवण्यासाठी महाराजांनी हि खेळी केल्याचे म्हणले आहे. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करत असताना औरंगजेबाने दिलेर खान ला मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी १५००० फौज देऊन चाल करून पाठवले होते. शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजेला तोंड देणे जिकिरीचे काम होते. त्यात अनेक मावळ्यांचा हकनाक बळी गेला असता. दिलेर खान मराठा साम्राज्यात पोहचल्यानंतर संभाजी महाराजांनी  दिलेर खान बरोबर पत्रव्यवहार चालू केला होता. त्यात त्यांनी स्वराज्यात त्यांची होणारी हेळसांड बोलून दाखवली. दिलेर खान यावर आनंदी झाला आणी त्याने संभाजी महाराज यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करत मुघल साम्राज्यात येण्याची विनंती केली. संभाजी महाराज यांनी यावर अत्यंत सावध आणि सावकाश भूमिका घेतली. “छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असल्याने स्वराज्याची जबाबदार आमच्याकडे असल्याने तूर्तास आम्हांस आपल्याकडे येणे शक्य नाही” असे म्हणत संभाजी महाराजांनी दिलेर खान यास अनेक महिने खेळवत ठेवले होते.

     मुघल साम्राज्यात आल्यास त्यांना कितीची मनसबदारी मिळणार, त्यांचे पद काय असणार यावर संभाजी महाराज दिलेर खान यांच्यात जवळपास ६ पत्रव्यवहार झाले होते, त्यात प्रत्येकवेळी संभाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली असल्याने प्रत्येक पत्रासाठी दिलेर खानाला औरंगजेबाची परवानगी घेण्यासाठी त्याच्या माणसांना पाठवावे लागे. यात अनेक महिन्यांचा काळ गेला. एवढी मोठी फौज घेऊन चालून आलेला दिलेर खान अनेक महिने पत्रव्यवहारात अडकून बसला होता. त्याची फौज विनालढाई असल्याने सुस्तावली होती. दिवसेंदिवस फौजेचा खर्च वाढत होता. संभाजी महाराजांनी राजकारणातील गनिमी कावा करत दिलेर खान ला स्वराज्यात चांगलेच अडकून ठेवले होते. परंतु, त्यानंतर छ. शिवाजी महाराज एप्रिल-मे १६७८ दरम्यान कर्नाटकच्या स्वारीवरून परतल्यावर त्यांनी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला (नोव्हेंबर १६७८) तिथून संभाजीराजे एक महिन्याने दिनांक १३ डिसेंबर १६७८ रोजी गडावरून माहुली येथे आले आणि मोगलाईत दिलेरखानाकडे गेले.अशा रीतीने संभाजीराजे स्वराज्यातून शत्रूपक्षात सामील झाले. दिलेरखानाने याचा फायदा घेऊन मराठी मुलखातील प्रदेश जिंकण्यास सुरूवात केली. दोघांनी काही गड घेतले. त्यात दि. १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड जिंकला, ७०० माणसे कैद केली. त्यांतील प्रत्येकाचा एक एक हात कापून त्यांना सोडून दिले, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत वेगळे दाखवले असून त्यात मावळ्यांचे हात तोडण्यास संभाजी महाराजांनी विरोध केला होता असे दाखवले आहे. यात ईतिहासकारांच्यात मतभेद आहेत.त्यानंतर संभाजी व दिलेरखान यांनी काही ठाणी घेऊन, मंगळवेढे जिंकून विजापूरच्या बाजूस गेले. त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली. संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते. संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावलल्याने संभाजी महाराज दिलेर खानावर नाराज होते.  याच सुमारास दिलेरखान व संभाजी यांत मतभेद होऊन राजे गुप्तपणे स्वराज्यात पन्हाळ्यास आले (२१ डिसेंबर १६७९). छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवले.


छ. शिवरायांचा मृत्यू-

. शिवाजी महाराज यांचा (३ एप्रिल १६८०) रोजी रायगडावर मृत्यू झाला तेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावर नजकैदेत होते. महाराजांच्या मृत्यूनंतर अण्णाजी दत्तो, मोरोजी पिंगळे, बाळाजी चिटणीस यांनी सोयराबाईंना सोबतीला घेऊन छोट्या राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. सर्वांनी मिळून राजाराम महाराजांना गादीवर बसवले. हंबीरराव मोहिते यांना संभाजी महाराज यांना कैद करण्यास पाठवले. परंतु सोयराबाईंचे बंधू हंबीरराव मोहिते यांनी हा खेळ मोडीत काढत संभाजी महाराजांना पन्हाळगडावरून सोडवले.

संभाजी महाराज यांनी रायगड ताब्यात घेतला आणि स्वराज्यद्रोह खेळ मांडलेल्या कारभाऱ्यांना कैद केले. संभाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेत शंभूराजे रयतेचे दुसरे छत्रपती झाले. स्वराज्यविरोधात कट रचलेल्या कारभाऱ्यांना संभाजी महाराजांनी मोठ्या मनाने  माफ करत सोडून दिले. १६८१ रोजी सोयराबाईंचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांनी स्वतः त्यांचा अंत्यविधी केला.

बुऱ्हाणपूर लुट-

छत्रपती शिवरायांच्या कैलासवासानंतर शंभूराजे छत्रपती झाले. शंभूराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. राज्याभिषेकानंतर एखादी प्रचंड लूट मोहीम आखून लूट मिळवावी व राज्याचा खजिना मजबूत करावा या हेतूने शंभूराजांनी मोघलांच्या बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला करून तेथील अठरा पुरे लुटून स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकण्याचा मनसुभा रचला. आधी संभाजी महाराज यांनी सुरत लुटणार अशी अफवा पसरवली. बुऱ्हाणपूर ची लूट करण्याचे नेतृत्व हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवले. ३० जानेवारी १६८१ रोजी सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. खानजहान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता. आणि त्याचा सहाय्यक होता काकरखान अफगाण. मोठ्या फौजफाट्यासहित मराठे ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे पुरे लुटीत होते. त्यांना मुबलक लुट मिळाली. त्यांनी जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाची त्यांनी परवा केली नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे इ. सर्व लुट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून दिले. व नंतर ते निघून गेले. या लुटीने औरंगजेब एवढा चिडला की तो उत्तरेकडची आलिशान गादी सोडून मराठ्यांवर आक्रमण करण्यास मोठा फौजफाटा घेऊन चालून आला.


रामशेज किल्ला लढाई-

एक तरी विजय मिळावा म्हणून औरंगजेब याने शहाबुद्दीन बरोबर आपली भली मोठी तुकडी नाशिक चा रामशेज किल्ला जिंकायला पाठवली.शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार  फौज फाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा रामसेज चे किल्लेदार सूर्याजी जेधे ५००-६०० मावळ्यांसोबत गडाचे रक्षण करत उभे होते. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकून आपल्या विजयाची ज्योत पेटवू. परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्याने शहाबुद्दीन च्या सैन्याला पुरते जेरीस आणले. मराठे गडावरून दगडगोट्यांच्या वर्षाव मुघल सैन्यावर करत त्यामुळे मुघल सैनिक हैराण झाले होते. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत. संभाजी महाराज यांनी किल्यावर रसद पोहचवण्यासाठी खास तुकडी तैनात केल्या होत्या. त्या तुकड्यांनी सुद्धा मुघल तुकडीला हैराण केले होते. औरंगजेबाने तब्बल तीन सरदारांना रामशेज जिंकण्यासाठी पाचारण केले परंतु एकालाही हा किल्ला जिंकला आला नाही. सलग ५ वर्षे हा किल्ला अजिंक्य राहिला. सूर्याजी जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा किल्ला अजिंक्य ठेवला.

कैद व मृत्यू-

१६८९ च्या सुरुवातीस संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराज यांच्या ३००-४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. मराठ्यांचा राजा वैरांच्या मगरमिठीत सापडला. पकडलेल्या संभाजी महाराज व कवी कलाश यांना बहादूरगडमध्ये नेण्यात आले, जेथे औरंगजेबाने त्यांची विदूषक कपडे घालून धिंड काढली.

संभाजी महाराजांना मराठ्यांसह आपल्या किल्ले, खजिना मुघल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितले गेले. परंतु झुकेल तो मराठा राजा कसला. ‘मोडेन पण वाकणार नाही‘ चा नारा देत मराठा साम्राज्याचा राजा मुघलांचे अत्याचार सोसत राहिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. औरंगजेबाला तुळापूरच्या संगमावर संभाजी महाराज यांना हलाल करावयाचे होते. आपली एकनिष्ठा न सोडणाऱ्या संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलश यांचेही डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत.

औरंगजेबाने संभाजी महाराजाना पुढील शिक्षा जीभ कापायची दिली. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली.. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहुन भीमा-इंद्रायणी सुद्धा रडु लागली. अखेर संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी भीमा – इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली.स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला. एवढे अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा झुकला नाही. याची सल औरंगजेबाला कायम राहिली.संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली.

अशा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा..!

जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय संभाजीराजे.....!

1 टिप्पणी: