Breaking

शुक्रवार, २० मे, २०२२

*शिरोळच्या गणेशवाडी मध्ये विधवा महिलांचा सन्मान ; वाईट प्रथा बंद करण्याचा केला ठराव*


सरपंच मा.प्रशांत अपिने ठरावाची प्रत मा.सदाशिव आंबी यांना सुपूर्त करताना 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


गणेशवाडी : कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या गणेशवाडीच्या ग्रामपंचायतीने विधवा महिलांचा सन्मान करीत वाईट प्रथा बंद करण्याचा ठराव करण्यात आला.या ऐतिहासिक निर्णयाने शिरोळ तालुका पुरोगामी असल्याचा  दर्शन आपल्या कृतीतुन ग्रामपंचायत व नागरिकांनी घडविले आहे.

     या अगोदरच असा ऐतिहासिक ठराव व निर्णय पहिल्यांदा शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेऊन क्रांतिकारक पाऊल उचलले. त्याची पुनरावृत्ती करीत गणेशवाडी या ग्रामपंचायतीने ही असा ऐतिहासिक निर्णय घेऊन क्रांतिकारक व पुरोगामी पाऊल उचलले आहे.

     या ग्रामपंचायतीने घेतलेल्या सभेत खालील ठराव करून विधवा प्रथा बंद करणे, पतीच्या निधनावेळी अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे. तसेच महिलाला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायदयाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करणेत येऊन विधवा सन्मान करून वाईट प्रथा बंद करणेत येत आहे त्यास ही सभा मंजुरी देत आहे. अशा प्रकारचा ठराव करुन ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

       सदर ठरावावर गणेशवाडी ग्रामपंचायतीचे कार्यशील सरपंच मा. प्रशांत बसगोंडा अपिने यांनी सदर ठराव राष्ट्रपती पुरस्कार विजेते व प्रसिद्ध नावाडी सदाशिव आंबी यांच्याकरवी महात्मा फुले सामाजिक संस्था,करमाळाचे अध्यक्ष मा. प्रमोद झुंजवडे यांच्याकडे सुपूर्त केला.

     मुळात विधवांचा सन्मान होणे व व विधवा महिलांची समाजाकडून होणारी हेळसांड थांबविण्यासाठी मा. प्रमोद झुंजवडे हे कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. विधवा महिलांच्या वर अन्याय करणाऱ्या प्रथा बंद करण्याबाबतचे आवाहन सर्व ग्रामपंचायतींना केलं होतं.ते सातत्याने या चळवळीच्या यशस्वी साठी प्रयत्नशील असतात. याचाच विचार होऊन ग्रामपंचायत हेरवाड व माणगाव या गावानी विधवा महिलांच्या सन्मानार्थ निर्णय घेतला.

    त्याच पावलावर पुरोगामी पाऊल ठेवीत गणेशवाडी ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. असा क्रांतीकारी निर्णय घेणारे गणेशवाडी ही तिसरी ग्रामपंचायत ठरली आहे.विधवा महिला सन्मानाच्या अनुषंगाने  या पुरोगामी निर्णयाने पुन्हा एकदा शिरोळ तालुका पुरोगामी असल्याचं दर्शन झालं. या परिवर्तनवादी निर्णयाबाबत समस्त ग्रामपंचायत व नागरिकांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

      भारतीय संविधानाला दैवत म्हणून अशा प्रकारचे महिला सन्मानार्थ निर्णय राज्यातील किंबहुना देशातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने घेऊन खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा