![]() |
व्याख्यानात मार्गदर्शन करताना दै.पुढारीचे कार्यकारी संपादक मा.श्रीराम पचिंद्रे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती शताब्दी सोहळा यानिमित्ताने "राजर्षी शाहू महाराजांचे कार्य,विचार व आजचा युवका करिता संदेश" या विषयावर मौलिक मार्गदर्शन करताना दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक मा.श्रीराम पचिंद्रे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,सचिव डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.डॉ. मनिषा काळे उपस्थित होत्या.
छ. शाहू राजांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रसिद्ध लेखक व दै. पुढारीचे कार्यकारी संपादक मा. श्रीराम पचिंद्रे मार्गदर्शन करताना म्हणाले, शाहू राजांनी लोकहितार्थ काम करताना सुरुवातीला छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्राचा सकल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी रचनात्मक कार्याच्या माध्यमातून समस्त लोकांचे हित जोपासण्याचे व वृद्धिंगत करण्याचे काम केले. शाहू राजांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून समाज परिवर्तनाचा मार्ग जोपासला. मात्र त्याची सुरुवात वेदोक्त प्रकरणानंतर खऱ्या अर्थाने झाली असल्याबाबतचा ते म्हणाले. पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांना रोख पैसे मिळावेत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ऊस, कापूस,तंबाखू ,चहा व कॉफीचे मळे या नगदी पिकांना महत्त्व देऊन या मालाच्या विक्रीसाठी मिरज रेल्वे लोह मार्गाची स्थापना केली. राजे नेहमी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितार्थ कार्य करताना उत्तम जलसंधारण व्यवस्था केली यामध्ये राधानगरी धरण व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती केली. यामागचा हेतू आपले संस्थान सुजलाम सुफलाम व्हावा हाच होता.
मा. पचिंद्रे पुढे म्हणाले की, औद्योगिक विकासाची सुरुवात शाहू स्पिनिंग मिलच्या माध्यमातून करून मांजरपाट सारख्या कापडाची निर्मिती केली. त्याचबरोबर ब्रिटिश सत्तेचा वापर करून संस्थानाचा हित संवर्धन करता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांनी सातत्याने विविध वृत्तपत्रे व क्रांतीकारी चळवळीला आर्थिक मदत देऊन त्यांना बळ दिले. या पुढे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठीचा सक्तीचा फतवा काढला. त्याचबरोबर १९१९ मध्ये वेठबिगारी कायदा रद्द केला. मात्र आज घडीला शाहुराजांच्या कृती व विचारांचा विसर समाजाला व राजकर्त्यांना पडला असून याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरतेशेवटी ते म्हणाले आज राजांच्या कृतिशील विचारांचा पाईक होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य, प्रा.डॉ.मनिषा काळे म्हणाल्या, छत्रपती शाहूराजे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी पदोपदी सर्वसामान्य जनतेचा विचार केला. स्त्रियांना मानसन्मान देऊन महिला हितार्थ अनेक उपक्रम राबविले होते आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ते परिपूर्ण सक्षम लोकराजा होते.
या कार्यक्रमाचे संयोजक व समन्वयक प्रा. डॉ. टी.जी.घाटगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रम आयोजनाबाबतचा हेतू स्पष्ट केला.प्रा. व्ही. देवकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.डॉ. एस.बी.बनसोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शेळके यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. आर .डी. तासगावकर ,प्रा. डॉ. एन. एल.कदम, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम, पर्यवेक्षक प्रा. बी.ए.आलदर व सीनियर व ज्युनियर मधील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी- सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सर्व घटकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा