![]() |
जयसिंगपूर भव्य ओबीसी जागर सभेत मार्गदर्शन करताना डॉ. चिदानंद आवळेकर |
*जयसिंगपूर मध्ये ओबीसी सभेत विचारवंतांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला विचारांचा जागर*
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : नामदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथे आयोजित भव्य ओबीसी सभेत ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने वैविध्यपूर्ण पद्धतीने विचारांचा जागर संपन्न झाला.
नामदार डॉ.जितेंद्र आव्हाड व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येत ५४ टक्के लोकसंख्या ओबीसी बांधवांची असून मात्र न्याय व हक्कासाठी एकत्र येऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे फक्त दहा टक्के ओबीसी बंधू सोडून इतर ९० टक्के बांधव मात्र सर्व गोष्टी पासून वंचित आहेत. आता लढाई ही जीवन मारण्याच्या प्रश्नांची आहे. ते पुढे म्हणाले, इतर मागास वर्ग (ओबीसी) हा देशभर किंबहुना राज्यभर विखुरलेला असून तमाम ओबीसी बांधव एकत्रित येणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांनी समतावादी व्यवस्थेचा स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांच्या मनात असलेली आरक्षणाबाबतची खदखद दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन राजकीय ओबीसी आरक्षणाची लढाई यशस्वी करूया.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे प्रसिद्ध धन्वंतरी व कृतिशील सामाजिक कार्यकर्ते डॉ. चिदानंद आवळेकर म्हणाले, हजारो वर्षापासून जाणीपूर्वक बहुजन समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन हितार्थ कार्य करणाऱ्या समाजसुधारकांना गोळ्या घालून हत्या केली जाते. आणि या देशातील प्रामाणिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला देशद्रोही म्हणून तुरुंगात डांबले जाते. मात्र दिल्लीच्या मुख्य चौकात संविधानाची प्रत जाळल्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. उलटपक्षी ते देशभक्त असल्याचा गाजावाजा केला जातो. अशा या अस्वस्थ देशात एससी,एसटी, एनटी,ओबीसी व अल्पसंख्यांक घटकांची पिळवणूक केली जात आहे. अशावेळी नामदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष मोबीन मुल्ला-आष्टेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जमीर मुजावर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधवासाठी सुरू असलेली जागर सभा खऱ्या अर्थाने प्रबोधनाचे व ओबीसी बांधवांना योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे अशा प्रकारचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
![]() |
विविध मान्यवर मार्गदर्शन करताना |
या ओबीसी जागर सभेत नामदार जितेंद्र आव्हाड विचार मंचाचे मराठवाडाचे अध्यक्ष मा.शिंदे यांनी ओबीसी जागर सभा एक स्तुत्य उपक्रम असून ओबीसी बांधवांना जागृत करणारे एक मंच असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला म्हणाले, ओबीसी बांधवावर सातत्याने अन्याय झालेला आहे. आता जाणीपूर्वक ओबीसींच्या राजकीय आरक्षण बंद करण्याचं कटकारस्थान सुरू आहे. त्यामुळे नामदार डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी बांधवांना एकत्रित आणून रस्त्यावरची लढाई जिंकण्याचा मानस आहे. प्रा. सहदेव घाटगे म्हणाले, अनुसूचित समाजामधील विविध जातीने एकत्रित येऊन आपलं आरक्षण टिकविण्यासाठी 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या विचारांना अमूर्त स्वरूप देण्याचे काम या बांधवांनी केलं. तरी ओबीसी बांधवांनी याच न्याय व कृतीप्रमाणे आपलं स्थान व आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
त्यानंतर दिगंबर सकट म्हणाले, दलित चळवळीशी सांगड घालून ओबीसी बांधवांनी ही लढाई लढली पाहिजे यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा इतिहास व महत्व विशद केले. गौतम वाघवेकर म्हणाले, देशातील चातुर्यवर्ण व्यवस्था खिळ खिळी करण्यासाठी देशात मोठ्या संख्येने असलेल्या इतर मागास प्रवर्गाने आत्मपरीक्षण करून हक्कासाठी लढाई केली पाहिजे.
इंजिनीयर मा. अण्णासाहेब पवार म्हणाले, ओबीसी बांधवांनी आपल्या बांधवांना सहकार्य करून ओबीसी संघटना मजबूत केली पाहिजे आणि हक्कासाठी सरकारच्या छाताडावर नाचले पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे डाॅ. विकास पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, या देशातील ८५ टक्के बहुजन समाजाला जाणीवपूर्वक वंचित व दारिद्र्यात खितपत ठेवण्यासाठी या देशातील विविध पक्ष, राजकीय पुढारी व प्रतिगामी काही संघटना सक्रिय आहेत हे ओळखून ओबीसी आरक्षण कसं टिकली यासाठी प्रयत्नशील रहावे.
सुरुवातीस संविधान पत्रिकेचा वाचन राहुल घाटगे यांनी केले. प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचा आभार मुबीन मुल्ला यांनी केले. ओबीसी जागर सभेचं उत्तम सूत्रसंचालन राहुल घाटगे यांनी सूत्रबद्ध रित्या केले.
या कार्यक्रमास जयसिंगपूर शहरातील मान्यवर नेते मंडळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकारण व चळवळीच्या माध्यमातून समाजातील बहुजन समाजाला व वंचित घटकाला न्याय देण्यासाठी कृतिशील कार्य करणारे नामदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ओबीसी जागर सभेला बळ देण्याचा विचार व प्रेरणा या सभेतून मिळाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा