Breaking

शुक्रवार, २० मे, २०२२

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्कर्षामध्ये राजर्षी छ.शाहू महाराजांच्या कृतिशील विचार व अर्थकारणीय दूरदृष्टीकोनाचा मोलाचा वाटा : प्रा.डॉ.राहुल म्होपरे यांचे प्रतिपादन*


सुयेक अध्यक्ष डॉ.राहुल म्होपरे मार्गदर्शन करताना


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 सांगली : सांगलीच्या ऐतिहासिक विलिंग्डन महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग , टी .एम .जोशी विचार मंच आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे अर्थकारण" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे   प्रमुख पाहुणे व व्याख्याते सुयेकचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे,डॉ. अर्जुनराव महाडिक, विद्यमान कार्याध्यक्ष प्रा. एम.जी. पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.भास्करराव ताम्हनकर हे उपस्थित होते.

       सुरुवातीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनोहर कोरे यांनी मान्यवरांचे स्वागत करुन व्याख्यान आयोजनाबाबत चा हेतू स्पष्ट केला.

        शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदे, कोल्हापूरचे (सुयेक) अध्यक्ष प्रा. डॉ. राहुल म्होपरे यांनी "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे अर्थकारण" या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना म्हणाले की, छ.शाहू राजांनी कृषीच्या यांत्रिकीकरणावर जोर ,   कामगार हिताचे, सुरक्षिततेचे धोरण अस्पृश्यता निवारण्यासाठीच्या विविध उपाययोजना,राधानगरी धरण, शाहू मिल ,लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जयसिंगपूर यासारख्या व्यापारी व औद्योगिक नगरीच्या उभारणीतून कोल्हापूर संस्थान अर्थात जिल्ह्याचा सर्वकष विकास झाले असल्याचे प्रतिपादन केले. तत्कालीन काळात कोल्हापूर संस्थान पूर्णपणे कृषिकेंद्रित असल्याने यासाठी छ. शाहूनी शेती क्षेत्रामध्ये नव उपक्रमशीलतेचा अवलंब केला. चहा- कॉफीचे मळे पन्हाळ्या जवळ फुलवले, त्यांचे प्रदर्शन भरवले. मुंबईला तो माल पाठवून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली. उद्योगांमध्ये नावीन्याला वाव दिला एवढेच नव्हे तर आजच्या पेटंटचे मूळ रूप असणारे संरक्षणाचे धोरण त्याकाळी त्यांनी स्वीकारले होते.कुस्ती सारखा खेळ नावारूपास आणला. त्यातून जातीय व सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर संस्थानात शैक्षणिक सवलती दिल्या.त्याकाळी १७ लाख रुपयाच्या शिष्यवृत्ती चालू केल्या.अनेक वसतिगृहांची उभारणी केली या सगळ्यात शाहू महाराजांचे अर्थकारणात अंतर्भूत होते.छ. शाहूंचे अर्थशास्त्रीय कृतिशील विचार  अभ्यासपूर्ण व सोप्या शैलीत मांडून उपस्थितांना ज्ञानरूपाने मंत्रमुग्ध केले. सरतेशेवटी ते म्हणाले, कोल्हापूरच्या चौफेर विकासामध्ये राजर्षी छ.शाहू महाराजांच्या दूरदृष्टी असलेला अर्थकारणीय कृतिशील विचाराचा महत्त्वाचा वाटा आहे.

       प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हनकर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये  शिक्षण क्षेत्रासाठी शाहू महाराजांचे योगदान खूप मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांनी स्वतः शैक्षणिक संस्था उभ्या करण्यासाठी देणग्या दिल्या तसेच इतर संस्थानिकांना  शैक्षणिक संस्थांना सर्वतोपरी सहकार्य व आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले.

        कार्यक्रमाचे नेटके व उत्तम नियोजन अर्थशास्त्र विभागाने केले होते. सदर कार्यक्रमास,विद्यार्थी व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. घडलींग यांनी केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. संदीप चव्हाण यांनी केले.

      सदर कार्यक्रमाचे व्याख्याते व नियोजनाबाबत उपस्थित घटकाकडून कौतुक व समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा