![]() |
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
कोल्हापूर : खूप दिवस चाललेल्या विद्यार्थी आणि संघटनांच्या आंदोलनानंतर अखेर शिवाजी विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला.
कोरोनानंतर राज्यातील सर्वच विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, विद्यापीठाने ऑफलाईन लेखी वर्णनात्मक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. याच्याविरोधात विद्यार्थी व संघटनांनी आंदोलन केले. काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे लॉ व अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केला. त्यानंतर विद्यापीठातील इतर अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घ्या, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यापीठाने सर्व परीक्षा स्थगित केल्या.
मा.कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विद्या परिषदेची बैठक झाली.ऑफलाईन एमसीक्यू परीक्षा ऑफलाईन पद्धतीने (प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर हजर राहून) ५० गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित (प्रश्नपत्रिकेमध्ये २५ प्रश्न प्रत्येकी २ गुण), परीक्षेचा वेळ १ तासाचा असेल. बहुपर्यायी प्रश्नावली (एमसीक्यू) पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. पदवी व पदव्युत्तर स्तरावरील परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठ जाहीर करणार आहे.
या निर्णयाने मात्र विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा