![]() |
प्रा.डॉ. अजितसिंह जाधव |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदी येथील प्रा.डॉ. अजितसिंह नारायणराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून आज ही घोषणा करण्यात आली.
डॉ. जाधव हे सध्या डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहामध्ये त्यांनी सन १९९३मध्ये अधिव्याख्याता पदापासून आपल्या कारकीर्दीस सुरवात केली. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक, अधिविभाग प्रमुख, डी.वाय. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरचे उप-प्राचार्य व प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, अधिष्ठाता (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष), अधिष्ठाता (अभियांत्रिकी विद्याशाखा), अध्यक्ष, अभ्यास मंडळ (इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) आदी विविध जबाबदारीच्या पदांवर कार्य केले आहे.
दि. ११ मे १९६८ रोजी जन्मलेल्या डॉ. जाधव यांचे मूळ गाव मेडशिंगी (ता. सांगोला, जि. सोलापूर) आहे. त्यांनी १९९० मध्ये शिवाजी विद्यापीठातूनच इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी (बी.ई.) घेतली. त्यानंतर वॉलचंद महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ई.) घेतली. त्यानंतर राजस्थानच्या सिंघानिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली.
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी निवड झाल्याचे समजल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. अजितसिंह जाधव म्हणाले, हिरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड होणे ही माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याने या निवडीला एक वेगळे महत्त्व आहे. या निवडीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह निवड समितीच्या सर्वच सदस्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. या कारकीर्दीत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक विद्यार्थीभिमुख सुधारणा करण्यावर माझा भर राहील. त्यासाठी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या अगोदर कोरोना महामारीच्या काळात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक म्हणून मा. गजानन पळसे यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा