Breaking

बुधवार, १ जून, २०२२

सहकारी साखर कारखान्यांमुळेच ग्रामीण विकासाचा कायापालट : प्रा.डॉ.शिवाजीराव भोसले यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. शिवाजीराव भोसले व सुयेकचे अध्यक्ष डॉ.राहुल शंकर म्होपरे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


देऊर : शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर (सुएक) आणि अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग, संभाजीराव कदम महाविद्यालयात देऊर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

      शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन(सुयेक)च्या परिवर्तनवादी व वैचारिक शिदोरी देणाऱ्या व्याख्यानमालेतील ४ थे व्याख्यान आयोजन करण्याचा निर्णय व मान संभाजीराव कदम महाविद्यालय,देऊर यांनी स्वीकारला. सुयेकमार्फत चालू वर्षात आयोजित करण्यात आलेल्या ही विशेष व्याख्यानमाला विविध सामाजिक आणि आर्थिक विषयांना सुवर्ण स्पर्श करीत वैचारिक व माहितीपूर्ण पद्धतीने सुंदररित्या कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून संभाजीराव कदम महाविद्यालयात 'ग्रामीण विकासातील सहकारी साखर कारखान्यांची भूमिका' या विषयावर अत्यंत प्रभावशील व अभ्यासू विचार ज्येष्ठ अर्थतज्ञ मा.प्रा.डॉ.शिवाजीराव भोसले यांच्यामार्फत प्रकट करण्यात आले. 

      या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.शिवाजीराव भोसले यांनी असे नमूद केले की, देशाच्या व राज्याच्या विकासात सहकारी साखर कारखान्याचा वाटा मोलाचा आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण भागातील उद्योगांच्या विकेंद्रीकरणाला चालना दिली तसेच रोजगाराच्या संधी वाढविण्यात, हमीभावाची हमी आणि ऊस उत्पादनाला रास्त भाव मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा.डॉ. भोसले म्हणाले की, सहकारी साखर कारखाने ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक एकोपा आणि सलोखा राखणे, विविध उद्योगांना चालना देण्याचे काम करत आहेत. एकूणच सहकारी साखर कारखाने हे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणारे महत्त्वाचे केंद्र आहे.


         शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मा.डॉ.राहुल शं. म्होपरे यांनी याच विषयाला स्पर्श करीत अर्थशास्त्रीय मांडणी केली. डॉ म्होपरे यांनी  यापुढे असे नमूद केले की, सुयेक संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व आर्थिक विषयांवर सर्वसाधारण चर्चा व्हावी या उद्देशाने अशा व्याख्यानांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांनी विशेषतः सामाजिक संशोधनात सहभागी व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुएक, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात या निमित्ताने तळागाळात  पोहचावी, अर्थशास्त्राचा प्रत्येक घटक यामध्ये समाविष्ट व्हावा म्हणूनच या विशेष व्याख्यानमालेची सुरुवात सुएक कार्यकारिणीने एकमताने केल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढेही अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयावर प्रेम करणाऱ्या सर्वच घटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. म्होपरे यांनी यानिमित्ताने केले.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे कार्यशील प्राचार्य डॉ.भरत भोसले यांनी सुएकने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

   सुयेक संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.एम.जी. पाटील, कार्यवाह - खजिनदार डॉ. संजय धोंडे  व शिवाजी विद्यापीठ व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष आणि सुएक कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.ए.के.पाटील या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ.शेडगे डी.बी. आणि होस्ट अर्थात उत्तम नियोजन डॉ. एस.एस. पोटभरे यांनी केले.

     या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित विद्यार्थी,प्राध्यापक व अन्य मान्यवर घटक यांनी सुयेकच्या या  व्याख्यान मालेबाबत व महाविद्यालयाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करुन कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा