![]() |
प्रा.एस जी पाटील यांचा सपत्नीक सत्कार करताना माजी आमदार प्रा.बी.टी.देशमुख, |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : प्रा. एस.जी .पाटील यांचे शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) ची संघटनात्मक बांधणीमध्ये आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये बहुमोल योगदान आहे.गेल्या पन्नास वर्षामध्ये प्राध्यापकांचे वेतन आयोग, विद्यापीठ कायदा, सेवाशर्ती, परिनियम, पेन्शन, ग्रॅच्युईटी अशा अनेक बाबींसाठींच्या लढ्यांमध्ये ते अग्रभागी होते . त्यांनी 'सुटा ' बरोबरच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ व अ भा प्राध्यापक महासंघाचे पदाधिकारी म्हणून संघटनात्मक बांधणीबरोबरच उच्चशिक्षणाच्या गुणात्मक विकासासाठी मोठे योगदान दिले . त्यांचे संघटन कौशल्य, कायद्याचे सूक्ष्म ज्ञान, तर्कशुद्ध प्रतिपादन, शिक्षण क्षेत्रातील सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास या सर्वांचा महाराष्ट्रातील प्राध्यापक संघटना आणि उच्च शिक्षण क्षेत्रास खूप फायदा झालेला आहे . अखिल भारतीय पातळीवर सुद्धा प्राध्यापक संघटना आणि उच्च शिक्षणामध्ये त्यांचे विचार आणि संघटन कौशल्य यांचा मोठा उपयोग झालेला आहे " असे गौरवोद्गार माजी आमदार व महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. बी टी . देशमुख यांनी काढले .
![]() |
डावीकडून डॉ.आर के चव्हाण,डॉ . प्रवीण रघुवंशी,डॉ.एस .पी . लवांदे, डॉ.अशोक बर्मन, प्रा.सी.आर.सदाशिवन.डॉ.डी.एन . पाटील |
याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा.बी. टी . देशमुख यांच्या हस्ते प्रा.एस.जी . पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी प्रा .पाटील यांच्या जीवनकार्याचा समग्र वेध घेणारा ' प्रा.एस.जी. पाटील गौरव ग्रंथांचे ' प्रकाशन प्रा.बी.टी . देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ.एस.पी.लवांदे होते. याप्रसंगी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ.अशोक बर्मन यांनी, प्रा.एस.जी.पाटील यांच्या देशव्यापी कार्याचे महत्व विशद केले . अ भा . प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राच्या पातळीवर केलेले कार्य त्यांनी अधोरेखित केले .
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. सी.आर.सदाशिवन यांनी, प्रा.पाटील यांच्या झुंजार व्यक्तिमत्वाचे व अभ्यासपूर्ण मांडणीचे पैलू उलगडले .
एम. फुक्टोचे प्रमुख कार्यवाह डॉ . प्रवीण रघुवंशी यांनी प्रा .पाटील यांची वैचारिकता, तत्वनिष्ठा , बाणेदारपणा व संघटन कौशल्य यांचा आढावा घेतला .श्री.राहुल पाटील यांनी प्रा.पाटील यांचे कौटुंबिक भावचित्र मांडले.
सत्कारास उत्तर देताना प्रा.एस.जी.पाटील (बाबा) म्हणाले, " जागतिकीकरणामुळे व खाजगीकरणामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेतून सरकार अंग काढून घेत आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण व्यवस्थेत खूप बदल केले आहेत. त्याचे समाजावर विपरीत परिणाम होतील . ग्रामीण भागातील शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे . संघटनेच्या पहिल्या पिढीने संघर्ष करून व लढे देऊन जे मिळवले ते किमान टिकवून ठेवण्यासाठी आज प्राध्यापकांनी व समाजातील सर्वच घटकांनी जागरुक राहून काम केले पाहिजे. संघटनेमुळे प्राध्यापकांना सेवाशाश्वती व वेतनमान मिळाले आहे . याची जाणीव प्राध्यापकांच्या आजच्या पिढीने ठेवावी व सामाजिक भान जपावे असे आवाहन त्यांनी केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा . एस . पी . लवांदे म्हणाले की, प्रा. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संघर्षामुळे व त्यागामुळेच आज प्राध्यापकांच्या पेशाला वेतन व सेवाशाश्वती प्राप्त झाली आहे . यापुढचा काळ कठीण असून संघटना राहिली तरच प्राध्यापक राहतील म्हणून प्रा. एस.जी.पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन तरुण पिढीने संघटनेत काम करावे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'सुटा 'चे अध्यक्ष डॉ .आर.के.चव्हाण यांनी केले व कार्यवाह डॉ.डी.एन.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले . मानपत्र लेखन व सूत्रसंचालन डॉ.अरुण शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाला 'सुटा'चे विश्वस्त प्रा . एस के कामते, प्रा.ए.पी. देसाई, प्रा. टी.व्ही.स्वामी,प्रा.सुधाकर मानकर 'सुटा' चे पदाधिकारी डॉ.अरुण पाटील, डॉ.इला जोगी, डॉ.अशोक पाटील व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कोल्हापूर, सांगली , सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, प्राध्यापक , विविध संघटनांचे कार्यकर्ते व पाटील यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खऱ्या अर्थाने कृतज्ञता सन्मान सोहळा हा एका अखंडपणे प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या शिक्षणातील वीर योद्धाचा अर्थात बाबांचा होता.हा सन्मान सोहळा शैक्षणिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांचा होता.
Very nice 👍
उत्तर द्याहटवा