![]() |
सुटाचे अध्यक्ष डॉ. आर.के.चव्हाण मार्गदर्शन करताना |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : एमफुक्टोने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत आहे.शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीने आजतागायत आंदोलनाचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याच टप्प्यातील एक भाग म्हणून विद्यापीठ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे यावेळी प्राध्यापकांच्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. त्यापैकी 'गो बॅक गो बॅक -NEP गो बॅक', प्राध्यापक एकजुटीचा विजय असो, 'जिंदाबाद-जिंदाबाद -एमफुक्टो जिंदाबाद', आणि जितेंगे - लढेगे यासारख्या घोषणांनी प्राध्यापकांनी आपली ऊर्जा व विविध मागणीसाठी ची असणारी तळमळ दाखविली. या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे पाऊस सुरू होता मात्र प्राध्यापक मोर्चा पासून हटले नाहीत. यावेळी तरुण प्राध्यापकांनी ही सक्रिय सहभाग दर्शविला आहे.
या आंदोलनात १)१००% रिक्त पदे भरली पाहिजेत २) जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे ३) CAS चे सर्व लाभ मिळालाच पाहिजे व अन्य महत्त्वाच्या मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या.
खऱ्या अर्थाने दि.१५ मे २०२२ ते १ जून २०२२ या कालावधीत विशेषांकाचे प्रकाशन करून आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ झाला. यानंतर सुटाने १ जून ते १० जून या कालावधीत कोल्हापूर,सांगली व सातारा या जिल्ह्यात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विविध मागण्यांच्या विषयी असलेली भूमिका मांडण्यात आली होती. दि.१ जुलै नंतर जिल्हानिहाय लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी व चर्चा करून मागणीची प्रत देण्यात आली. या टप्प्याला ही उत्तम प्रतिसाद मिळाला होता.याच पार्श्वभूमीवर रविवार दि.१७ जुलै २०२२ रोजी कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यात जिल्हा मेळावे आयोजित करून यशस्वी करून दाखविण्यात आले.१६ जुलै रोजी काळ्या फिती लावून प्राध्यापकाने निषेध नोंदविला होता.
दि.१८ जुलै ,२०२२ रोजी पुणे येथील संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन टप्पा पूर्ण करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील एमफुक्टोशी संबंधित असणाऱ्या विविध प्राध्यापक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवून मागणी पूर्ण करण्यासाठी सहभाग दाखविला होता.
यानंतर एमफुक्टोने १ ऑगस्ट,२०२२ राजी, सहसंचालक- उच्च शिक्षण, कोल्हापूर यांच्या कार्यालयावर मोर्चा/धरणे आंदोलन आयोजित केले होते. यासाठी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुटाचे शेकडो प्राध्यापक सहभागी झाले होते.यावेळी सुटाने केलेल्या विद्यापीठ पातळीवरील कार्याचा आढावा घेतला. सदर आंदोलनाच्या मागणीची प्रत शिष्टमंडळांनी सहसंचालक प्रा.डॉ.हेमंत कठरे यांना दिली होती.
आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून १९ ऑगस्ट,२०२२ रोजी शिवाजी विद्यापीठ कार्यालयावर मोर्चा व मा. कुलगुरूंना हस्तक्षेप करणारे निवेदने सादर करण्यात आली.२५ ऑगस्ट,२०२२ रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एमफुक्टोच्या वतीने निवेदने सादर करण्यात येणार आहे. यानंतर मात्र वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन आंदोलनाचा अंतिम टप्पा पूर्ण केला जाईल.
विद्यापीठ कार्यालयासमोरच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
यावेळी सुटाचे अध्यक्ष डॉ. आर.के. चव्हाण यांनी एमफुक्टोच्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली. आजची शैक्षणिक परिस्थिती व राष्ट्रीय शिक्षण धोरण प्राध्यापकांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.सुटा संघटना नेहमीच प्राध्यापक घटकाला केंद्रबिंदू मानून त्याच्या हितार्थ काम करीत असते. त्यामुळे आगामी होणाऱ्या विद्यापीठीय निवडणुकीत प्राध्यापकांनी सुटाच्या बाजूने सक्षम पणे राहून सुटा संघटना मजबूत करण्याचे काम केलं पाहिजे. येणाऱ्या काळात आपली लढाई अस्तित्वाची व जबाबदारीची आहे.विचारांशी नाळ बांधून एकनिष्ठ राहून कार्य करीत राहणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. सुटा कार्यवाह प्रा. डॉ. डी.एन.पाटील यांनी आभार व्यक्त करून या मोर्चाचा समारोप केला.
कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा. सुधाकर मानकर व सांगली जिल्हा समन्वयक प्रा. टी. व्ही.स्वामी, खजिनदार प्रा. डॉ.अरुण शिंदे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.अरुण पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. ए.बी.पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. प्रकाश कुंभार व प्रा. डॉ. आर.जी.कोरबू,तिन्ही जिल्ह्याचे कार्यवाह, खजिनदार, मध्यवर्ती कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सुटाचे तिन्ही जिल्ह्यातील सभासद प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या एमफुक्टोने दिलेल्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्पा यशस्वी करीत सुटाने आपली कार्यपद्धत दाखवून दिली.मोर्चाच्या निमित्ताने सुटा संघटना ही दिवसागणिक मजबूत होत चालली आहे हे स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा