Breaking

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

*विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाला ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा घोषित*


0
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर (कॅटेगरी-१ दर्जा प्राप्त)


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू प्रा.डॉ.डी. टी. शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्र.कुलगुरु प्रा.डॉ.पी.एस.पाटील, प्र. कुलसचिव प्रा.डॉ.विलास शिंदे व परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ.अजितसिंह जाधव व डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते.

    कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळूर) यांचे ३.५१ सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-१’, ३.२६ ते ३.५० या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-२’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-३’ अशी ही श्रेणी रचना करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाला नॅकच्या ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘A++’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-१’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयीसुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. याचा लगोलग विद्यापीठाला झालेला लाभ म्हणजे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळालेली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. त्याचप्रमाणे विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवावयाचे असल्यास त्यासही मान्यता मिळू शकते. शिवाजी विद्यापीठ आता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यासही पात्र ठरले आहे. त्यानुसार विद्यापीठ आता पुढे जात असून आवश्यक कन्टेन्ट विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

    नजीकच्या काळात याचे आणखीही लाभ शिवाजी विद्यापीठाला पर्यायाने विद्यार्थ्यांना होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

      विद्यापीठाला युजीसी कडून कॅटेगिरी १ चा दर्जा घोषित झाल्याने शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व घटकांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा