Breaking

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये ग्रामीण विकासाचा सूर ; अभ्यासपूर्ण व्याख्याने व सर्वकष संशोधन पेपरच्या माध्यमातून सर्वांगीण ग्रामीण विकासाचा जागर*


आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा अर्थशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने शुक्रवार व शनिवार दिनांक २३ व २४ सप्टेंबर २०२२ रोजी "Rural Development in Industry 4.0 at Crossroads Ahead" या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर चर्चासत्र कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्टडीज अँड रिसर्च, सातारा व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. 

     सध्या संपूर्ण जागतिक स्तरावर चौथ्या टप्प्यातील औद्योगिक क्रांती सुरू आहे. यामध्ये ऑटोमेशन, ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोट टेक्निक्स, इंटरनेट ऑल थिंग्स इत्यादी गोष्टींचा प्रचंड प्रमाणात वापर वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) याद्वारे अनेक नाविन्यपूर्ण बदल उत्पादन, उत्पादन पद्धती आणि वितरण यामध्ये घडून येत आहेत. याचे दूरगामी परिणाम ग्रामीण विकासावर व शेतीवर होणार आहेत. यासंबंधी या चर्चासत्रात तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

    या चर्चासत्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे ज्येष्ठ अर्थतज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रो. डॉ. जे. एफ. पाटील यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले. या चर्चा सत्राकरिता दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथील 'ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचे मल्टी कंट्री हेड प्रो. डॉ. निशिकांत बोहरा हे आलेले होते. त्यांच्या बीजभाषणाने या चर्चासत्राची सुरुवात झाली.

यानंतर 'इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज', अहमदाबाद, गुजरातचे प्रो. डॉ. प्रवीण जाधव यांनी आधुनिक कृषीमध्ये होऊ घातलेल्या बदलांविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स व मॅनेजमेंट फॅकल्टीचे डीन प्रो. डॉ. एस. एस. महाजन यांनी वाणिज्य व कॉमर्स क्षेत्रामधील होणाऱ्या बदलांचे शेती व ग्रामीण भागावरील परिणाम व येणारी नवी आव्हाने या विषयी मार्गदर्शन केले.

    तिसऱ्या सत्रामध्ये शोधनिबंध सादरी करण्यासाठी प्रो. डॉ. आण्णा काका पाटील, चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज  बिझनेस इकॉनॉमिक्स यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्रा. डॉ. प्रकाश टोणे यांनी रॅपोर्चर म्हणून काम केले. या चर्चासत्रामध्ये पश्चिम बंगाल येथून सौ. पपीता दत्ता यांनी ऑनलाइन शोधनिबंधाचे सादरीकरण केले. याशिवाय डॉ. अरुण जाधव, डॉ. करपे, डॉ. बोदगिरे व इतर संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांचे सादरीकरण केले. 

    दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये प्रो. डॉ. एन. जयंता देवाश्री हे श्रीलंकेच्या सबर्गमुवा युनिव्हर्सिटीमधून या चर्चासत्राकरिता ऑनलाइन जॉईन झाले व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मलेशियाच्या स्कूप्रो या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ डॉ. बालाजी नायडू यांनी ऑनलाइन लिंकद्वारे ग्रामीण विकासातील चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे होणारे बदल याविषयी मार्गदर्शन केले. 

   तिसऱ्या सत्रामध्ये जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे प्रो. डॉ. अनिल पांडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये इंत्थराप्रनर्शिप डेव्हलपमेंटच्या नव्या संधीविषयी मार्गदर्शन केले. 

      चौथ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ह्युमॅनिटीज फॅकल्टीचे डीन प्रो. डॉ. एम. एस. देशमुख यांनी नव्या औद्योगिक क्रांतीद्वारे ग्रामीण भागामध्ये स्टार्टअप व उद्योजकता विकासाच्या कोणकोणत्या संधी आहेत व त्याच्यातून ग्रामीण विकास कसा साध्य होऊ शकतो याविषयी विवेचन केले. यानंतर चर्चासत्राच्या शेवटच्या भागात "कृषी विकासाच्या संदर्भात औद्योगिक क्रांती 4.0" या विषयावर पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले होते. या पॅनल डिस्कशनकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी, सोलापूरचे "स्कूल ऑफ सोशल सायन्सचे डायरेक्टर व रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे विभागप्रमुख प्रो. डॉ. गौतम कांबळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादचे, अर्थशास्त्र विभागप्रमुख, प्रो. डॉ. सुनील नरवडे व कोल्हापूर विभागाचे विभागीय सहसंचालक प्रो. डॉ. हेमंत कठरे या मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये ग्रामीण भागातील औद्योगिक क्रांतीतून होणाऱ्या बदलांचा, नवीन आव्हानांचा व संधींचा परामर्श घेण्यात आला. 

       यानंतर या चर्चासत्राची सांगता महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ व शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख प्रो. डॉ. वसंतराव जुगळे यांच्या समारोपपर भाषणाने झाली. त्यांनी ग्रामीण भागातील कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑन थिंग्स, टेक्नॉलॉजी, रोबोट टेक्नॉलॉजी या सर्वांच्या वापरातून शेतीमध्ये येत्या काळात कोणत्या प्रकारच्या नवीन बदलांना सामोरे जावे लागणार आहे व कोणत्या नव्या संधी निर्माण होणार आहेत याविषयी व शेतीतील वास्तव परिस्थितीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या चर्चासत्राच्या आयोजनामध्ये रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव व ऑडिटर सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे साहेब व कर्मवीर भाऊराव पाटील मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च चे डायरेक्टर डॉ. बी. एस. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे व कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे प्रो. डॉ. सारंग भोला यांनी कन्वेनर म्हणून अत्यंत यशस्वीपणे केले.

   या चर्चासत्राकरिता देश-विदेशातून ९० संशोधकांनी आपले शोधनिबंध पाठविले आहेत. सदर शोधनिबंध पिअर रिव्ह्यू जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. या चर्चासत्रकरिता ३६१ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

      या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात अत्यंत अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक विश्लेषणाच्या माध्यमातून अत्यंत यशस्वी व परिपूर्ण  सादरीकरण व सांगोपांग चर्चा संपन्न  झाली.सदर कार्यक्रमाबाबत संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.तसेच या यशस्वी व नियोजनबद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सर्व घटकांकडून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा