![]() |
कुलगुरू मा. डॉ. डी.टी.शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील,प्र.कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे,संचालक प्रा.अभय जायभाये(एन एस एस),प्रा.डॉ.अजितसिंह जाधव, डॉ. शिवाजी जाधव व सर्व मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात उद्या बुधवार दि. २८ पासून ते ३० सप्टेंबर २०२२पर्यंत तीन दिवसीय राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन (N.R.D./S.R.D.) निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय मुंबई यांचे निर्देशान्वये सन २०२२-२३ या वर्षासाठी ही निवड चाचणी आहे. यापूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये सन २००६ व २०१६ या सालामध्ये सदर निवड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर निवड चाचणी शिबिराचे वैशिष्ट्ये :
१) महाराष्ट्रातील २९ विद्यापीठांमधून एकूण ३१० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
२) यामध्ये १५३ मुले, १५७ मुली, ११ पुरुष कार्यक्रम अधिकारी व १० महिला कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहेत.
३) शिबिरात राष्ट्रीय / राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची परेड, वजन, उंची, मुलाखत, इत्यादींच्या माध्यमातून निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ४) सायंकाळच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.
५) या निवड चाचणी शिबिराच्या माध्यमातून ३१२ विद्यार्थ्यांमधून ५६ विद्यार्थी पश्चिम विभागीय (West Zone) संचलनासाठी, १४ विद्यार्थी राष्ट्रीय पथसंचलनासाठी (NRD) निवडले जाणार आहेत आणि उर्वरित ४२ विद्यार्थ्यांमध्ये आणखी ३८ विद्यार्थ्यांची निवड करून एकूण ८० विद्यार्थी राज्यस्तरीय पथसंचलनासाठी (SRD) निवडले जातील.
६) सदर शिबिराच्या निवड समितीमध्ये डॉ. कार्तिकेयन (क्षेत्रीय संचालक), डॉ. प्रशांतकुमार बनजे (राज्य संपर्क अधिकारी), अजय शिंदे (युवा अधिकारी), एनसीसी ऑफिसर्स, शारीरिक शिक्षण संचालक, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. अभय जायभाये सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
७) सदर शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्र.कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह संयोजन समिती आणि सल्लागार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे प्रा. अभय जायभाये, सर्व जिल्हा, विभागीय समन्वयक, विद्यापीठातील अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहेत.
८) शिवाजी विद्यापीठातून या शिबीरासाठी १२ मुली व १२ मुले असा २४ स्वयंसेवकांचा संघ सहभागी होणार आहे. डॉ. एन. बी. माने (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा) व डॉ. सुनिता तेलशिंगे (श्री. अण्णासाहेब डांगे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले) यांची संघ व्यवस्थापक म्हणून निवड केली आहे. या स्वयंसेवकांची निवड विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली या तिन्ही जिल्ह्यांतून केलेली आहे.
९) निवड शिबिरात सहभागी स्वयंसेवकांची निवास व्यवस्था विद्यापीठ आवारातच केलेली आहे. स्वयंसेवक विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था मुलांचे वसतिगृह क्र. ३ या ठिकाणी तर संघ व्यवस्थापक व संयोजन समिती सदस्य यांची निवासाची व्यवस्था संशोधन विद्यार्थी वसतिगृह येथे केलेली आहे. मुलींची निवास व्यवस्था विद्यार्थिनी वसतिगृह येथे केलेली आहे.
१०) तसेच येणाऱ्या महिला संघ व्यवस्थापक व व्यवस्थापन समिती महिला यांचीही सोय विद्यापीठ अतिथिगृह येथे केलेली आहे. सर्वांसाठी भोजन व्यवस्था, नाश्ता व चहाची व्यवस्था राजमाता जिजाऊ सभागृह येथे असणार आहे.
११) बाहेरील विद्यापीठातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, कसबा बावडा यांचेकडून करण्यात आलेली आहे. त्यांची बस कोल्हापूर सेंट्रल बस स्टेशन ते विद्यापीठ इथेपर्यंत असतील.
मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन दिन परेड निवड शिबीराच्या अनुषंगाने पत्रकार परिषद झाली. सदर परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, मास कम्युनिकेशन विभाग समन्वयक डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते. सदर पत्रकार परिषदेत मा. कुलगुरू यांनी माहिती दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा