![]() |
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जे.एफ.पाटील व प्रा. डॉ.अशोक चौसाळकर व मा. प्रसाद कुलकर्णी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या 'समाजवादी प्रबोधिनीचे काम अविरतपणे व सातत्यपूर्ण पद्धतीने सुरू आहे. आज या कामाची गरज अतिशय वाढती आहे. त्यामुळे हे काम सर्वार्थाने अधिक गतिशील व व्यापक केले पाहिजे. त्यासाठी भारतीय राज्यघटनेची मूल्ये आणि गांधीवादापासून मार्क्सवादापर्यंतची सर्व तत्वज्ञाने मानणाऱ्या प्रत्येकाने समाजवादी प्रबोधिनीला आर्थिक मदतीपासून उपक्रमातील सक्रिय सहभागापर्यंतचे सर्व प्रकारचे सहकार्य करावे. आगामी चार वर्षात समाजवादी प्रबोधिनी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करेल.त्यावेळी लोकप्रबोधन करणारी एक सर्वार्थाने सक्षम संस्था या दृष्टीने तिची वाटचाल करण्याचा संकल्प समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि गेली अकरा वर्षे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ नेते प्रा.डॉ. एन. डी.पाटील यांनी केला होता. त्या संकल्पची पूर्ती करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे .ती आपण आपल्या प्रत्येकाच्या सक्रिय सहभागाने सामूहिकपणे पार पाडू असा विश्वासही आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या पंचेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. अशोक चौसाळकर मंचावर उपस्थित होते.
समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले तसेच विषय पत्रिकेचे वाचन केले. आणि आचार्य शांतारामबापू गरुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या समाजवादी प्रबोधिनीच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रारंभी प्रा.डॉ. एन.डी. पाटील, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह अहवाल वर्षात कालवश झालेल्या सर्वांना आदरांजली वाहण्यात आली.या बैठकीमध्ये विषयपत्रिके वरील सर्व विषयांवर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले.त्यामध्ये प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,बी. एस. खामकर ,प्रा.शिवाजीराव होडगे, प्रा. विजयकुमार जोखे, प्रा.डॉ.संजय साठे, प्रा.डॉ. काशिनाथ तनंगे एम.एस.चौगुले, प्रा.रमेश लवटे, तुकाराम अपराध आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यातून समाजवादी प्रबोधिनीचे काम व्यापक करण्याच्या दृष्टीने आपली भूमिका मांडली. गेली पंचेचाळीस वर्षे सुरू असलेले समाजवादी प्रबोधिनीचे सैद्धांतिक प्रबोधनाचे काम अधिक विकसित करणे, गेली तेहेतीस वर्षे सुरू असलेले ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाचे वर्गणीदार-वाचक वाढविणे, तीस हजारावर ग्रंथांनी समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालयाचा विकास करणे यासह इतर अनेक नवे उपक्रम सुरू करण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.या सभेत ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांच्यासह प्रबोधिनीच्या विविध शाखातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा