![]() |
नफरत छोडो- देश जोडो या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. चिदानंद आवळेकर व मान्यवर |
भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या संप्रदायिक शक्तीमुळे अनेक शतकांच्या भारत देशाच्या सांस्कृतिक आणि विश्वबंधुत्वाच्या परंपरेला सुरुंग लावला जात आहे. आपल्या संकुचित राजकारणापाई धर्म, जात, भाषेच्या नावाखाली सामाजिक ध्रुवीकरण करून विभाजनवादी प्रवृत्तीना प्रोत्साहन देण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भारताचे संविधान हा आधुनिक भारताचा धर्मग्रंथ आहे. या पवित्र ग्रंथाच्या आत्म्याची हत्या करण्याचे प्रयत्न सातत्यान सुरु आहेत.
एकबाजूला अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून देश बेरोजगारी व महागाईमुळे त्रस्त झाला आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत, शेतमजूर, शेतकरी- कामगार आत्महत्या करीत आहेत, महीला, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण आणि सांप्रदायिकीकरण करून नव्या पिढी च्या विचारविश्वात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रश्नांबाबत जनमत जागृत करण्यासाठी आणि आपल्या देशाचे ऐक्य व अखंडता अबाधित राखण्यासाठी आदरणीय राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा सुरू केली आहे.
सदर यात्रेला पाठींबा देण्यासाठी देशातील जनआंदोलनांच्या वतीने स्वराज्य इंडिया यांच्या पुढाकाराने कोल्हापूर समता भूमी ते नांदेड या मार्गावर जनसंवाद यात्रा आयोजित केली आहे. दि. 2 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. दि. 2 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर मधून सुरु होणाऱ्या या यात्रेच्या उद्घाटनासाठी स्वराज्य इंडीयाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव येत आहेत. कोल्हापुर वरून सायं दि. 2 नोव्हेंबर कोल्हापुर, इचलकरंजी, जयसिंगपूर वरून ही यात्रा पूढे सांगली जिल्हयात जात आहे.
दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जयसिंगपुर मध्ये येत आहे. या यात्रेचे स्वागत व आदरणीय योगेंद्र यादव यांच्या सभेच्या नियोजनासाठी समाजवादी प्रबोधिनी कार्यालय जयसिंगपूर येथे बैठक आयोजित केली होती. दसरा चौक येथे यात्रेचे स्वागत करून क्रांती चौक, गांधी चौक या मार्गाने पदयात्रा करून नगरपालिकेजवळ जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले. यावेळी मा. राजू शेट्टी, गणपतराव पाटील व उल्हासदादा पाटील सहभागी होत आहेत.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. चिदानंद आवळेकर हे होते तर मा. अमर निकम (शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस), नितीन बागी जिल्हा कार्याध्यक्ष युवक काँग्रेस), सुभाष भोजणे (माजी नगराध्य राजू सनदी (उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा, युवा काँग्रेस), जयदीप थोरात (प्रवक्ता कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस), चंद्रकांत जाधव - घुणकीकर (मराठा महामंदूक नेते), सलीम नदाफ (काँग्रेस ओ.बी.सी.सेल अध्यक्ष) प्रा.अशोक शिरगुप्पे, पाटील, डॉ. तुषार घाटगे, डॉ. सुनिल बनसोडे, सदाशिव सुभेदार (राष्ट्र सेवा दल, साधना मंडळ), जयपाल बलवान, कुतुबुद्दीन दानवाडे, रघु नाईक (स्वाभिमानी शेतकरी संघटना), खंडेराव हेरवाडे (अं.नि.स. युनुस जमादार, राजू नदाफ यासह जनआंदोलन संघटनांचे मान्यवर सहभागी होते.
यावेळी सदर यात्रेच्या संयोजनामध्ये चे मुख्य असणारे इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ललित बाबर, स्वराज्य पश्चिम महाराष्ट्र संयोजक व राष्ट्र सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते मा. बाबासाहेब नदाफ यांनी यात्रेच्या व अभियानाच्या उद्देशा विषयी मार्गदर्शन केले. तर आभार प्रदर्शन कॉ. रघुनाथ देशिंगे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा