![]() |
बदलत्या परिस्थितीत युवकासमोरील बिकट आव्हाने |
*लेखक डॉ. महावीर जयकुमार बुरसे |
भूगोल विभाग, ज्युनिअर कॉलेज
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर (7588577637)
*Mahaveera99@gmail.com*
प्रास्ताविक : वाचक मित्रहो, संपूर्ण देशात आजादी का अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. यामध्ये देशातील प्रत्येक घटक सहभागी होत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने हा राष्ट्रीय महोत्सव औपचारिकपणे पूर्ण केला जात आहे की, वास्तवते मध्ये आपला देश हा अमृत महोत्सव साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. कदाचित आपणास वाटत असेल, राष्ट्रीय उत्सव साजरा होत असताना लेखकाच्या मनामध्ये हा प्रश्न का निर्माण झाला असावा. मात्र वाचक हो एका बाजूला अमृत महोत्सव साजरा होणे ही एक औपचारिकतेचा भाग आहे तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या ७५ वर्षात देशाचा समग्र विकास झाला काय? या देशातील युवकांचे भविष्य उज्वल होणार का? असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५.६ कोटी युवक असून भारत हा तरुणांचा व युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणी देशाचा आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी करण्यामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांना किमान संधी उपलब्ध झाल्या तर देश गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची निर्मिती करू शकतो. आज भारतीय युवक इतर देशांच्या तुलनेत सर्व पातळीवर पिछाडीवर असल्याबाबतचे आंतरराष्ट्रीय अहवाल उपलब्ध आहेत.
भारतीय मनुष्यबळाची गुणवत्ता नेमकेपणाने जाणून घ्यावयाची असेल तर जागतिक पातळीवर कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) दरवर्षी मानव विकास निर्देशांक जाहीर करते. त्यानुसार भारत हा जगामध्ये १२९ व्या स्थानी आहे. याचा अर्थ भारत जागतिक पटलावर मानव विकासाच्या बाबतीमध्ये पिछाडीवर आहे.राजकर्त्यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाची पोपटपंची व अकृतीशील शाब्दिक चर्चा केली जाते. भारत देश हा तरुणांचा देश असून जगात सर्वात अधिक तरुणाई भारतामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा करून टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे कोणतेही कार्य केले जात नाही. मुळात या देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत गंभीर असून गरीब व श्रीमंत यामधील दरी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशावेळी या देशातील युवकांच्या भविष्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे. तरुणाई म्हटलं की देशाच्या कार्यशील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत मानले जाते. परंतु या देशातील युवकांसमोर बेरोजगारी, उत्तम शिक्षण व आरोग्य विषयक प्रश्न, पाश्चात्य संस्कृतीचा अनुकरण, राज्यकर्त्यांकडून युवकांचा गैरवापर, मोबाईलचा अतिवापर, वाढती लोकसंख्या, पक्षांतर्गत मर्कंट लीला,युवकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, राजकीय नेतृत्वाचा भोंदू व बेजबाबदारपणा, जाणीवपूर्वक बनवलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती, राष्ट्रीय सण व उत्सवाचे सोयीनुसार विकृतीकरण असे असंख्य यक्ष प्रश्न युवकासमोर उभे ठाकले आहेत.
आजची तरुणाई अस्वस्थ, असुरक्षित, बेजबाबदार,नेतृत्वहीन, दिशाहीन,निकृष्ट मानसिकता व असंवेदनशील बनत चालली असून दिवसेगणिक यामध्ये वाढ होत चालली आहे.सध्याच्या सरकार समोर महागाई व युवकांच्या प्रश्नाविषयी अग्रक्रमाने व गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक असून यासाठी रचनात्मक व विकासात्मक ध्येय धोरणे आखली पाहिजेत. केवळ राजकीय पोकळ व दिखाऊ चर्चा नसली पाहिजे.
देशाचं भवितव्य हे युवकांच्या अस्तित्वावर अवलंबून असून सरकारने वेळीच युवक सक्षम बनण्यासाठी काही ठोस व कृतीशील उपक्रम राबवणे आवश्यक आहे. सरकारने युवकांना नोकरीचे आमिष दाखवून अग्निवीर नावाची तकलादू राष्ट्रीय रोजगाराची योजना आणून ४ ते ५ (हंगामी) वर्षासाठी रोजगाराची व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे युवकांचे भवितव्य घडणार नसून उलटपक्षी भविष्याविषयी साक्षंकता निर्माण होणार आहे.
जागतिक पातळीवर जागतिक आनंद जाणून घेण्यासाठी वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्सचे मापन केलं जातं याद्वारे जगातील 136 देशांमध्ये जीडीपी, दरडोई उत्पन्न,आयुष्मान, सोशल सपोर्ट,निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचार व दुसऱ्या घटकांना सहकार्य या निकषाच्या आधारावर वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स मापन केले जाते. मात्र फिनलँड नामक युरोपियन देश हा जगात वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स मध्ये प्रथम स्थानी असून भारत हा 146 देशांमध्ये 136 व्या क्रमांकावर आहे याचा अर्थ भारत हा वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स च्या बाबतीमध्ये पिछाडीवर आहे. या संदर्भानुसार भारतीय युवकांची अवस्था वरील निकषांच्या अपूर्णतेमुळे निर्माण झाली आहे स्पष्ट होते.
जागतिक पातळीवर युवकांची विकास पातळी मोजण्यासाठी 'युथ डेव्हलपमेंट इंडेक्सचे' मापन केले जाते. यामध्ये 186 देशांमध्ये भारताचा 122 वा क्रमांक लागतो. युथ डेव्हलपमेंट इंडेक्स मापन करण्यासाठी युवा शिक्षण, रोजगार, आरोग्य, समता व समावेशकता, शांतता आणि सुरक्षा, राजकारण आणि नागरी सहभाग या निकषांच्या आधारावर युथ डेव्हलपमेंट इंडेक्सचे मापन केलं जाते यामधून जगभरातील युवकांची क्रियाशील व विकासधिन स्थिती दर्शवली जाते. यामध्ये भारतीय युवकांची 'युथ डेव्हलपमेंट इंडेक्स' मधील कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. याला जबाबदार या देशातील राजकीय अनास्था व जाणीवपूर्वक युवकांना गुलाम बनवण्याची केलेली व्यवस्था होय.
जागतिक युवक कल्याण निर्देशांक (द ग्लोबल युथ वेलबीइंग इंडेक्स) मध्ये ही भारत 181 देशांमध्ये 122 व्या स्थानी असून आशा, अपेक्षा, बुद्धिमत्ता आणि चिंता वाढत असून जागतिक बदलत्या परिस्थितीनुसार कौशल्याचा अभाव व संधीची गरज या मध्ये जागतिक युवक कल्याण निर्देशांका मध्ये भारतीय युवक पाठीमागे आहे. यामध्ये लिंग समानता, आर्थिक संधी, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग यामध्ये ही भारतीय युवक पिछाडीवर आहे यावरून ही भारतीय युवकांची दयनीय स्थिती दिसून येते.
आज वैश्विक पातळीवर 1987 पासून शाश्वत विकासाची संकल्पना जोरकसपणे मांडली जात असून यामध्ये युवकांचा सहभाग कमी असणे हे गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. या देशात ग्रामीण भागात युवकांची लोकसंख्या 67% असून हे युवक चारित्रहीन व ध्येयशून्य व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली जीवन जगत आहेत. पाश्चात्य व चुकीच्या अनुकरण पद्धतीचा सर्रास अवलंब झाल्याने भारतीय संस्कृतीचे वाभाडे निघत आहेत. चुकीची जीवनशैली व पद्धती हा जीवनाचा अविभाज्य भाग म्हणत आहे. युवकांच्या आरोग्यविषयक अनास्था असून आजचा युवक हा फास्ट फुडच्या दुनियेत जिभेचे लाड पुरवण्यासाठी जगत आहे. त्यामुळे संतुलित आहार व उत्तम विहार याकडे तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कमी वयात असंख्य व्याधीने तो त्रस्त होत असून यामध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार, ब्लड शुगर, शरीराचा स्थूलपणा व अन्य व्याधी जडल्या जात आहेत.
देशातील युवकांचे व्यसनाधीनतेचे प्राबल्य वाढत असून मुंबईतील एका एनजीओने केलेल्या सर्वेक्षणानुसार यामध्ये रेव्ह पार्टी फॅडच्या माध्यमातून 92 टक्के युवक व 80 टक्के युवती व्यसनाधीन झालेले आहेत. विविध google साइटवर ऑनलाइन खेळ व अश्लील व्हिडिओ क्लिप्स व मनोरंजन करणाऱ्या घटकांमध्ये युवक गुंतला जात असून ही गोष्ट खेदजनक व देशाच्या भविष्याला मातीमोल करणारी आहे. ग्रामीण भागातील युवक गुटखा-मावा खाणे, तंबाखू चघळणे व नशा करणे यामध्ये गुंतलेला असून शहरी भागातील तरुण मात्र ड्रग्स मध्ये अडकलेले आहेत ही बाब चिंताजनक असून याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
स्थानिक व राष्ट्रीय सण समारंभात भारतीय संस्कृतीचे विकृतीकरण स्पष्टपणे दिसून येत आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा अंधानुकरण व भारतीय संस्कृतीचे पाय मल्ली होताना दिसत आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या विविध डेच्या निमित्ताने युवकांच्या विचारांचा व संस्कारांचा अधिपतन होताना दिसत आहे.
आज युवकाला रोजगाराची व नोकरीची गरज असून दिशाभूल करणाऱ्या माध्यमाद्वारे युवाकांना प्रभावित केलं जात आहे. त्यांचे जीवन अंधारमय बनत चालले असून याकडे जबाबदार घटकांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
या देशाचं खरं भवितव्य हे युवकांच्या हाती असून या पार्श्वभूमीवर युवकांचं विविध पातळीवरती प्रबोधन करण्याची गरज असून समाजात घडणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एक मुखाने संघटितपणे उभे राहिले पाहिजे. सरकारने बहुजन हिताय व बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याप्रमाणे प्रामाणिकपणे आपली जबाबदारी व बांधिलकी जपून युवकांच्या मूलभूत गरजा व रोजगाराची कायमस्वरूपी व्यवस्था केली पाहिजे. यापुढे जाऊन युवकांच्या व्यसनाधीनता दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर उपायांची सक्ती करणे गरजेचे आहे. शैक्षणिक गुणवत्तेची विकास करताना दिल्ली सरकारच्या धर्तीवर शैक्षणिक कार्यक्रम आखणे व त्याची सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आरोग्यम् धनसंपदा याविषयी युवकांच्या मध्ये जनजागृती करून शासकीय व संघटनात्मक पातीवर कार्यक्रमाची रूपरेषा आखणे व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. एन.एस.एस., एनसीसी, स्काऊट गाईड व अन्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्कार व सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज देखील या निमित्ताने पुढे येत आहे.
सरतेशेवटी युवकांना नोकरी व रोजगार हमीची व्यवस्था किंबहुना रोजगार मिळेपर्यंत बेकारी भत्ता देणे गरजेचा आहे. आजच्या गळेकापू व स्पर्धात्मक युगात जगातील इतर युवकांच्या बरोबरीने स्पर्धाशील बनवणे गरजेचे आहे. यासाठी तांत्रिक व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या शिक्षण प्रणालीचा उचित उपयोग करणे गरजेचे आहे यासाठी सरकार युवकांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणं महत्त्वाचं आहे. समाजातील जबाबदार घटकांनी युवकांच्या भावनेशी न खेळता युवकांचे भविष्य बनविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रोजगार व व्यवसाय भिमुख शिक्षण प्रणालीचा वापर करून विविध लघु, कुटीर व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना युवा उद्योजक बनवणे आवश्यक आहे. युवकांच्या विचारांची व कृतीची एकसंघ शक्ती समाज उत्थान व विकासासाठी वापरली पाहिजे. भविष्यात देश मजबूत पायावर उभा करावयाचा असल्यास अर्थात महासत्ता बनवायचा असल्यास युवकांची शक्ती वापरल्याशिवाय हे शक्य होणार नाही. आजच्या मनोरंजनात्मक जगात चित्रपटातील डायलॉगच्या माध्यमातून तरुणाईच मनोरंजन केलं जाते. त्यामधील एका चित्रपटातील सुंदर डायलॉग तुम दूध मांगोगे तो हम खीर देंगे और काश्मीर मांगोगे तो चिर देंगे! या टाळ्या वाजवण्या पलीकडे या वाक्यांना अर्थ उरत नाही. मात्र पोकळ व भोंदू राष्ट्रवाद युवकांना बलशाही बनवू शकत नाही. प्रखर राष्ट्रवाद व वास्तव राष्ट्रप्रेम या युवकांच्या निर्माण केल्यास खऱ्या अर्थाने देशाच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारणाला दिशा मिळू शकते.
या निमित्ताने एक निर्धार करू! युवाशक्ती मजबूत करू!
सक्षम रोजगार, उत्तम शिक्षण, सर्वांग सुंदर आरोग्य व उचित सुरक्षितता या चतुरसूत्रीचा कार्यक्रम युवकांना प्रदान करून खऱ्या अर्थाने देश बलशाही बनवू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा