Breaking

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

*अधिकारांची जाणीव ठेवण्याबरोबरच कर्तव्यांचे पालन करा : प्रा.डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांचे प्रतिपादन*


डॉ. ज्ञानराजा चिघळीकर मार्गदर्शन करताना


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रमुख*


कोल्हापूर : भारतीय संविधान जगातील एक सर्वोत्कृष्ट संविधान आहे. लोकशाही गणराज्याची   उभारणी करणे हे संविधानाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे, परंतु आज लोकशाही धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्य माणूस हा भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे.  भारतीय संविधानाने जसे मूलभूत हक्क दिलेले आहेत तसेच कांही कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत. आपण फक्त मूलभूत हक्कांसाठी लढत असतो आणि कर्तव्य मात्र विसरतो. संविधानाचे रक्षण करणे याचा अर्थ कर्तव्याचे पालन करणे असा सुद्धा होतो. त्यामुळे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील राष्ट्र उभारण्यासाठी मूलभूत अधिकारांची जाणीव ठेवण्याबरोबरच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. असे मत प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी व्यक्त केले. ते येथील  संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय सावंत हे होते.


      डॉ. चिघळीकर बोलताना पुढे म्हणाले की, कोणतेही राष्ट्र धर्मावर उभे राहू शकत नाही. म्हणुनच संविधान निर्मात्यांनी भारतीय लोकांना धर्म असेल परंतु राष्ट्र धर्मनिरपेक्ष राहील याची काळजी संविधानात घेतली आहे. मार्गदर्शक तत्त्वांची योग्य अमलबजावणी करण्यात राज्यकर्ते  अपयशी ठरलेले आहेत म्हणुनच आज सर्वच समाज घटकांनी आरक्षण हाच आपल्या उन्नतीचा मार्ग आहे आणि ते मिळालेच पाहिजे असा आग्रह धरला आहे, परिणामी आज भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आलेली आहे.  भारत हा मुळात बहुसांस्कृतिक देश आहे. एकमेकांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. 

         स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल संभाजी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. संतोष पवार यांनी मानले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रास्ताविकेचे  सामूहिक वाचन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा