Breaking

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

लग्नासाठी मुली मिळेनात ? अचंबित तितकच दाहक वास्तव....

 

संग्रहित छायाचित्र 

        दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी अर्थात कालच सोलापूर वर्तमानपत्रांमध्ये अचंबित करणारी बातमी वाचली. बातमीचे शीर्षक होते, "बायको मिळावी" म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोहोळचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मा. बोरसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तरुण मुलांचा नवरदेवाच्या वेशातला हा मोर्चा जाणार असल्याचे बातमीत म्हटलं होतं. 

    बातमी वाजताक्षणी हसू आले, मात्र दुसऱ्याच क्षणाला प्रखर वास्तव डोळ्यासमोर तरळू लागले. स्त्रीभ्रूण हत्येच्या संदर्भाने अंनिसने तीस वर्षांपूर्वी दाखवून दिलेला धोका आज आपण झेलत आहोत. मुलगाच हवा या हट्टापायी वारे माप प्रमाणात झालेल्या स्त्रीभ्रूण हत्येचा हा दृश्य परिणाम आपण पाहत आहोतच. भले आज एक, दोन मुलीवरच कुटुंब नियोजन होत असेल तरीही तीस वर्षाची दरी आपण लगेच भरून काढू शकणार नाही हेही तितकच खरं. त्यामुळेच मुलींची संख्या खूप कमी आहे. 

     ज्या काही मुली आहेत त्या 99% मुली शिक्षण घेत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुलांप्रमाणे काम करण्यासाठी मुलींना राखीव जागा आहेत. चांगलीच गोष्ट आहे. आणि म्हणूनच शिक्षणाप्रमाणेच मागण्या आणि अपेक्षा वाढणे साहजिक आहे. मात्र ह्या मागण्या आणि अपेक्षा दोन्ही पक्षांसाठी कित्येक ठिकाणी घातकही ठरत आहेत. 

      सरकारी नोकरी हवी, शेती हवी, वेल सेटेड हवे, मॉडर्न कुटुंब छोटं हवं, या अन् यापेक्षा जास्त अपेक्षा जशा मुलीच्या आहेत तसंच गोरी असावी, संसाराला हातभार लावणारी असावी, एकटीने घर सांभाळणारी असावी, धाकात राहणारी असावी, या आणि यापेक्षा जास्त अपेक्षा मुलांकडूनही वाढत आहेत. टाळी एका हाताने जशी वाजत नाही तसंच दोषही एकाच बाजूला देता येत नाही. परिस्थिती अशी निर्माण होत आहे की, ढिगभर अपेक्षा करणारे अनेक कुटुंब आंतरजातीय विवाह अथवा अनाथालयातील मुला मुलींशी लग्न करताना दिसत आहेत. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतात त्याप्रमाणे, समाजाच्या बदललेल्या या स्थितीला पूरक म्हणून की काय लग्न करून फसवणाऱ्या टोळ्या देखील अनेक ठिकाणी सापडत आहेत, सारस कसं संस्कृतीला धक्का देणारं आहे.

     फक्त स्त्रीभ्रूणहत्याच नव्हे तर समाजातील अनेक घटक या स्थितीला जबाबदार आहेत. स्त्रीला समाजात असणारी असुरक्षितता असेल अथवा स्व कमाईचा अहंकार असेल दोन्ही गोष्टी विरोधाभास वाटत असल्या तरी विचार करायला लावणार्या आहेत. म्हणूनच जन्मदात्यांकडून स्त्रीला स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच स्वावलंबी करण्याचा प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून होतो आहे. आणि तो व्हायलाच हवा. मग असं असताना लग्नानंतरच्या प्रत्येक अपेक्षेचं ओझं स्त्रीकडून अपेक्षित असणं हेही कुठेतरी चुकीचं वाटतं. घरातील प्रत्येकाला मान सन्मान मिळावा, प्रत्येकांचे स्वातंत्र्य अबाधित राहील आणि आपसात प्रेम,जिव्हाळा, आपुलकी आहे असे आदर्श कुटुंब आज मुलींच्या समोर फारसे जाणवतं नाही. 

        भले शिक्षण कमी असू दे परंतु सुसंस्कृत मुलगी हा जसा समाजाचा आदर्श आहे तसाच स्वावलंबी,कष्ट करून प्रामाणिक जगणारा,निर्व्यसनी, आपुलकीने वागणारा मुलगा, कमी मिळवणारा असला तरी तोही आदर्शच आहे हे सुज्ञ पालकांनी समजून घ्यायला हवं. मुलं किती मिळवतात यापेक्षा, मिळवती मुलं कुटुंबाशी अथवा समाजाची कशी वागतात हे महत्त्वाचं आहे. मग ती मुलगी असो अथवा मुलगा. मुलावर अथवा मुलीवर संस्कार इतके छान घडावेत की समोरच्या पार्टीकडून डोळे झाकून होकार मिळाला पाहिजे. अशा गोकुळ समान कुटुंबाची प्रतिमा नक्कीच समाजामध्ये उच्च स्थानी असते. आई-वडिलांच्या संस्काराकडे पाहून आणि आई-वडिलांची समाजातील प्रतिमा पाहून कित्येक झालेली लग्नं आज  सुरळीत चालू आहेत, म्हणूनच विवाहाने दोन मनेच नव्हे तर दोन घराणे जोडली जातात हे लक्षात घेतले पाहिजे.

      मान्य आहे पैसा महत्त्वाचा आहे मात्र माणूस त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे. याचा विचार वधू वर दोन्ही पक्षाकडून झाल्यास काही प्रमाणात का होईना या प्रश्नाचे उत्तर सापडू लागेल. 


लेखिका सौ आरती लाटणे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा