Breaking

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

*कोल्हापूरचे मा.संदीप परशराम माने, यांचे सदवर्तनी प्रामाणिक पणाबद्दल मनःपूर्वक आणि जाहीर अभिनंदन*

 

संदीप परसराम माने यांचा सत्कार करताना अमेय तिरोडकर, प्रा.डॉ. अशोक चौसाळकर व  प्रसाद माधव कुलकर्णी


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : सोमवार ता.१२ डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये कॉ.अविनाश पानसरे व्याख्यानमालेला मी श्रोता म्हणून उपस्थित होतो. मा.संजीव खांडेकर वक्ता आणि डॉ. रणधीर शिंदे अध्यक्ष असलेल्या या व्याख्यानाला मी व माझे अन्य सहकारी पहिल्या रांगेत बसलो होतो.व्याख्यान संपल्यानंतर मी सहकाऱ्यांशी गप्पा मारत सभागृहाबाहेर आलो.आणि इचलकरंजीची वाट धरली.  थोड्याच वेळात मला एक फोन आला. त्या व्यक्तीने मला आपली काही वस्तू गहाळ झाली आहे का ?असे विचारले मी खिसा चाचपून पाहिला तर खिशात पाकीट नव्हते .मी त्यांना म्हणालो माझे पाकीट गहाळ झालेले दिसतंय. ते म्हणाले, होय ,त्या पाकिटातील आपल्या व्हिजिटिंग कार्ड वरील नंबर पाहूनच हा फोन करत आहे .'मी संदीप माने, शाहू स्मारक भवन येथे साऊंड ऑपरेटर म्हणून काम करतो.' आपले पाकिट सापडले ते माझ्याकडे सुरक्षित आहे. त्यावेळी मी त्यांना मनापासून धन्यवाद दिले .आणि म्हणालो या व्याख्यानमालेतील उद्या मा.अमेय तिरोडकर यांच्या व्याख्यानाचा मी अध्यक्ष आहे. तेव्हा आत्ता परत येण्यापेक्षा मी उद्या संध्याकाळी येईल तेव्हाच आपण भेटू.

     मी काल संध्याकाळी तिथे गेल्यावर त्यांना फोन केला. मी ठरवले होते की आपल्या अध्यक्षीय भाषणानंतर जाहीरपणे त्यांना मंचावर बोलवून या घटनेचा उल्लेख करायचा.या प्रामाणिक सदवर्तनाबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करायचा.मी त्यांना तसे बोलूनही दाखवले. मी  ग्रंथभेट व पत्र घेऊन गेलो होतोच.पण कमालीचा साधेपणा दाखवत त्यांनी असा जाहीर सत्कार नको म्हणत त्यांनी स्टेजवर यायला नम्र नकार दिला.मग मी आम्ही जेथे बसलो होतो त्या शाहू स्मारक भवनच्या  गेस्ट रूममध्ये याबाबतची सर्व माहिती देऊन ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांच्या हस्ते व डॉ. अशोक चौसाळकर ,डॉ. मेघा पानसरे, कॉ.दिलीप  पवार , कॉम.एस.बी.पाटील आदींच्या उपस्थितीत संदीप माने ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.

  संदीप यांनी सत्कार झालेली घटना घरी सांगितली. आणि माझे पत्रही दाखवले .माझे नाव बघून त्यांचे वडील परशुराम माने म्हणाले की मी प्रसाद कुलकर्णी यांना ओळखतो.आज सकाळी त्यांचा  फोनही झाला.ते गेली अनेक वर्षे भाई माधवराव बागल विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. संदीप १९९९ पासून शाहू स्मारक भवन मध्ये कार्यरत आहे. गेल्या वीस -बावीस वर्षांमध्ये आपल्या मुलाने शाहू स्मारक मधील अशा अनेक सापडलेल्या वस्तू मूळ व्यक्तीकडे पोहोचवल्या आहेत. असे अभिमानाने परशुराम माने मला म्हणाले .या सर्वाचा मला विलक्षण आनंद झाला.

    ही घटना साधी वाटत असली तरी असाधारण आहे असे मला वाटते .कारण सध्याचा काळ हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खोटेपणा, फेकूगिरी यांनी बोकाळलेला काळ आहे. सार्वत्रिक अस्वस्थता आहे. अशावेळी दाखवली गेलेली ही मानवता आणि प्रामाणिकपणा फार अनमोल आहे .गांधीजी' सत्य ही ईश्वर है 'म्हणत आणि मार्क्स ' मुद्दा आहे जग बदलण्याचा ' म्हणत. ते सत्यात उतरेल असा विश्वास देणारी या कृतीला मनापासून सलाम. सत्य स्वयंसिद्ध असते, ते संयत असते वाचाळ नाही,सत्य दर्शनी असते असत्य प्रदर्शनी असते.

    संदीप माने यांनी स्टेजवर जाहीर सत्काराला नम्र नकार देऊन आपण राजर्षी शाहू महाराज आणि भाई माधवराव बागल यांचे कृतिशील वारसदार आहोत हे दाखवून दिले. हा चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून ही पोस्ट समाज माध्यमावर मी जाहीरपणाने लिहीत आहे. संदीप माने यांचे या सत्यक्रियेबद्दल जाहीर अभिनंदन...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा